‘झी मराठी’वर नुकतीच ‘धाकट्या सूनबाई’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यामध्ये लोकप्रिय अभिनेता मंदार जाधव प्रमुख भूमिका साकारत आहे. त्याच्या भूमिकेचं नाव आहे वेदांत पटवर्धन. वेदांत हा आजच्या पिढीचा सुशिक्षित, सुसंस्कृत तरुण आहे. या भूमिकेच्या निमित्ताने मंदार पहिल्यांदाच झी मराठीसह काम करत असून, या नव्या प्रवासाबद्दल आणि त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल त्याने माहिती दिली आहे.

मंदार आपल्या भूमिकेबद्दल सांगतो, “धाकट्या सूनबाई’मध्ये मी वेदांत पटवर्धन ही व्यक्तिरेखा साकारत आहे. वेदांत हा आजच्या पिढीचा मुलगा आहे. तो सुशिक्षित, सुसंस्कृत आहे. आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करणारा, प्रत्येकाला सांभाळून घेणारा आणि सर्वांचा आदर करणारा असा हा मुलगा आहे. वेदांतच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे तो अन्याय किंवा अत्याचार कधीच सहन करत नाही. त्याच्या समोर कोणावर अन्याय होत असेल, तर तो त्याविरोधात ठामपणे उभा राहतो. अगदी आपल्या कुटुंबाच्या विरोधात जावं लागलं तरी योग्य गोष्टीसाठी तो मागे-पुढे पाहत नाही. त्यामुळे प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलामध्ये असावा असा आणि प्रत्येक मुलीला आपला जोडीदार असा असावा वाटेल, अशी ही व्यक्तिरेखा आहे.”

अभिनेता पुढे म्हणाला, “मला झी मराठीसह काम करण्याची इच्छा होती; मात्र काही कारणांमुळे ते योग्य प्रकारे जुळून येत नव्हतं. ‘धाकट्या सूनबाई’ ही मालिका कोठारे व्हिजनची निर्मिती आहे. याआधीही मी कोठारे व्हिजनबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे जेव्हा मला या मालिकेसाठी कॉल आला, तेव्हा मी लगेच होकार दिला. एक म्हणजे झी मराठीसह काम करण्याची संधी मिळत होती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा महेश कोठारे सरांसोबत काम करण्याची संधी मिळणार होती. त्यामुळे हा कॉल माझ्यासाठी खूप खास होता आणि माझा आनंद खरंच दुप्पट झाला होता.”

“माझा नेहमीच प्रयत्न असतो की माझी प्रत्येक नवीन भूमिका माझ्या आधीच्या पात्रांपेक्षा वेगळी दिसावी. त्या व्यक्तिरेखेचा लूक वेगळा असावा, तिची देहबोली वेगळी असावी आणि प्रेक्षकांना माझ्यातील एक नवीन बाजू पाहायला मिळावी, यासाठी मी प्रयत्न करत असतो. वेदांतच्या भूमिकेसाठी मी स्वतःला फिजिकली ट्रान्सफॉर्म केलं आहे. त्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. रोज जिमला जाणं, खाण्यापिण्याचं पथ्य पाळणं आणि स्वतःच्या फिटनेसवर लक्ष देणं, हे सगळं मी करत आहे. त्याचा परिणाम तुम्ही प्रोमोमध्ये पाहिला असेलच आणि मालिकेतही तो नक्कीच जाणवेल. मला प्रेक्षकांकडूनही या लूकला आणि प्रोमोला छान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे माझी मेहनत प्रेक्षकांपर्यंत पोहोचतेय याचा खूप आनंद आहे.” असं मंदार जाधवने सांगितलं.