मनीषा रानीने ‘झलक दिखला जा’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचे ११ वे पर्व जिंकले आहे. मनीषाने वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून या शोमध्ये एंट्री घेतली होती. तिने शोएब इब्राहिम, श्रीराम चंद्रा, अद्रिजा सिन्हा आणि धनश्री वर्मा या चार स्पर्धकांना मागे टाकत हा शो जिंकला. तिने शो जिंकल्यानंतर तिचा मराठमोळा कोरिओग्राफर पार्टनर आशुतोष पवार चर्चेत आला आहे.

‘झलक दिखला जा’ ११ जिंकल्यावर मनीषा रानीला ट्रॉफी व ३० लाख रुपये मिळाले, तर तिचा कोरिओग्राफर आशुतोष पवारला १० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. याशिवाय दोघांनाही अबुधाबीच्या यस आयलंडची फ्री ट्रिपही मिळाली आहे. हा शो जिंकल्यानंतर आशुतोषने केलेल्या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

वाइल्ड कार्ड स्पर्धक मनीषा रानी ठरली ‘झलक दिखला जा ११’ ची विजेती, आंतरराष्ट्रीय ट्रिपसह मिळाली ‘इतकी’ रक्कम

१३ वर्षांच्या मेहनतीनंतर आशुतोषला हे यश मिळालं आहे. “एकवेळ अशी आली होती जेव्हा वाटलं की प्रोफेशन बदलून घ्यावं, पण हिंमत नाही झाली. माझ्या सोबत असलेले सगळे पुढे जात होते आणि मला कळतच नव्हतं की मी कुठे चुकतोय. खूप लोक विचारत होते की तू स्क्रीनवर का दिसत नाहीस, पण संधीच मिळत नाहीये हे त्यांना कसं सांगू तेच सुचत नव्हतं. आज ही ट्रॉफी हातात आल्यावर १३ वर्षे एका सेकंदात डोळ्यासमोर आली. माझं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी खूप आभारी आहे. पुढे काय होईल माहीत नाही, पण आज जे घडलंय ते कधीच विसरू शकत नाही. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यामुळे हे घडलंय. अखेर आम्ही जिंकलो, आता झलकच्या विजेत्या कोरिओग्राफर्सच्या यादीत आशुतोष पवार हे आणखी एक नाव सामील होईल,” अशी पोस्ट आशुतोषने फेसबूकवर व्हिडीओ शेअर करत लिहिली.

धोनीला आकाश अंबानीने शिकवलं दांडिया खेळायला, मग थाला अन् ब्राव्होची जोरदार जुगलबंदी, व्हिडीओ पाहिलात का?

आशुतोषच्या या पोस्टवर त्याचे चाहते व मित्र-मैत्रिणी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. त्याने १३ वर्षांच्या मेहनतीनंतर मिळवलेल्या या यशाबद्दल सोशल मीडियावर त्याचं कौतुक केलं जात आहे.