Manoj Tiwari Daughter Rhiti Bigg Boss 20 Emotional Breakdown: भाजपा खासदार व अभिनेते मनोज तिवारी यांची मुलगी सध्या ‘हिंदी बिग बॉस २०’मुळे चर्चेत आली आहे. रिती तिवारी ही सध्या बिग बॉसच्या घरात तिच्या वादामुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. शोमध्ये तिने वडिलांबद्दल आणि कुटुंबाबद्दल सांगितले आहे. यावेळी रितीने तिच्या वडिलांचे नाव पुढे घेऊन जाण्याबद्दल असलेला तणाव आणि त्यामुळे जीवे मारण्याच्या आणि लैंगिक अत्याचाराच्या धमक्या येत असल्याचा खुलासा केला आहे.
बिग बॉसच्या घरामध्ये रिती तिवारी व मेरी कॉम यांच्यामध्ये झालेल्या संवादामध्ये तिने कुटुंबाबद्दल खुलासा केला. यावेळी मनोज तिवारी यांची मुलगी असल्याने तिच्यावर असणारा दबाव तसेच आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे तिच्यावर झालेला परिणाम याविषयी मत मांडले. या घटनांमुळे तिचा नात्यांकडे आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे रिती तिवारीने सांगितले.
लैंगिक अत्याचाराच्या धमक्याही दिल्या जातात – रिती
रिती तिवारी म्हणाली, “माझ्यावर खूप दबाव असतो. कारण- मी जे काही बोलेन ते मनोज तिवारी यांची मुलगी असे बोलते असे म्हटले जाते. मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात, लैंगिक अत्याचाराच्या धमक्याही दिल्या जातात, कारण मी त्यांची मुलगी आहे. माझे जे काही मत असेल तेच माझ्या वडिलांचेसुद्धा असेल असे लोक समजतात.”

बिग बॉसमध्ये रिती तिवारीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही सांगितलं आहे. ती म्हणाली, “आई-वडील वेगळे झाल्यानंतर माझ्यासाठी नात्यांचा अर्थ पूर्णपणे बदलला. माझ्या आईने मला एकटीने वाढवलं आहे आणि सांभाळ केला आहे, त्यामुळे याचा माझ्या आयुष्यावर परिणाम झाला असून माझा नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.”

रिती तिवारीने तिच्या रिलेशनबाबतही सांगितले. ती म्हणाली, “मला आयुष्यात काही लोक भेटले होते, पण त्यांना मला कंट्रोल करायचे होते. पण, माझ्या आयुष्यावर व निर्णयांवर दुसऱ्या व्यक्तीचं नियंत्रण असलेलं नातं मला नको होतं. कारण- मला माझ्या कामातून पैसे कमवायचे आहेत. मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. पण, याआधी मी माझ्या बेस्ट फ्रेंडवर प्रेम करत होते. आम्ही २० वर्षांपासून एकमेकांना ओळखत होतो, पण दुर्दैवाने आमचे ब्रेक-अप झाले.”

दरम्यान, रिती तिवारी ही तिचे वडील मनोज तिवारी यांच्याप्रमाणे गायक असून ती निर्माती व लेखकसुद्धा आहे. तिने ‘बारिश’, ‘मानसिक संतुलन’, ‘झूठी बेबी’ यांसारखी गाणी रिलीज केली आहेत. सोशल मीडियावर ती प्रचंड लोकप्रिय असून आता ‘बिग बॉस हिंदी’मध्ये सहभागी झाली आहे.
