Manasi Salvi Talks About Television Actor’s : मराठी इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा कलाकार मंडळी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये एकत्र काम करत असतात. तर हेच कलाकार ओटीटीवरील वेब सीरिजमध्येसुद्धा पाहायला मिळतात. पण, हिंदीमध्ये मात्र असं नसतं. हिंदी इंडस्ट्रीतील चित्र मराठीपेक्षा वेगळं आहे.
मराठी मालिका विश्वामध्ये काम केलेले अनेक लोकप्रिय कलाकार पुढे मराठी चित्रपट, नाटक आणि वेब सीरिजमध्ये पाहायला मिळतात. हिंदी मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम करणारे कलाकार मात्र फार क्वचितच मोठ्या पडद्यावर झळकतात. हिंदीमध्ये अनेकदा टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या कलाकारांना मोठ्या संधी मिळत नाही आणि त्यांच्याकडे टेलिव्हिजनमधील कलाकार या दृष्टिकोनातूनच पाहिलं जातं, त्यामुळे अनेकदा कलाकार याबद्दल खंतही व्यक्त करत असतात. अशातच मराठमोळी अभिनेत्री मानसी साळवीनेही याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
मानसी साळवी मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मानसीने मराठी मालिका व चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. यासह तिने अनेक हिंदी मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण आणि खलनायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या अभिनेत्री तिच्या नवीन मालिकेमुळे चर्चेत आहे.
टेलिव्हिजनबद्दल मानसी साळवीची प्रतिक्रिया
मानसी साळवीने ‘फ्री प्रेस जर्नल’शी संवाद साधताना टेलिव्हिजनमध्ये काम करणाऱ्या कलाकारांकडे त्याच दृष्टीने पाहिलं जातं, याबद्दल प्रतिक्रिया देत खंत व्यक्त केली आहे. मानसी म्हणाली, “जेव्हा माझ्याच क्षेत्रात काम करणारे लोक मोठी संधी मिळाल्यानंतर टेलिव्हिजनकडे वेगळ्या नजरेने पाहतात आणि पुन्हा कधीच टेलिव्हिजनवर काम न करण्याचा विचार नक्की करतात, तेव्हा मला खूप वाईट वाटतं.”
टेलिव्हिजनबद्दल मानसी पुढे म्हणाली, “टेलिव्हिजन आईसारखं आहे. लोक टेलिव्हिजनला सिल्व्हर स्क्रीन म्हणतात, पण मला असं वाटतं की टेलिव्हिजन हे आईसारखं आहे; जिथे प्रत्येक व्यक्तीचं स्वागत केलं जातं. चित्रपटात काम करणारे कलाकार ते ओटीटीवर काम करणाऱ्या कलाकारांपर्यंत टेलिव्हिजनवर सगळ्यांचं स्वागत केलं जातं. मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे. काही वेळेला माझ्याकडेसुद्धा टेलिव्हिजनवरील अभिनेत्री या नजरेने पाहिलं जातं.”
