Marathi Actor Abhijeet Kelkar New Business : गुढीपाडवा हा चैतन्याचा व मांगल्याचा सण. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने, या शुभदिवशी नवीन गाडी किंवा घर खरेदी करणं, सोनं विकत घेणं किंवा या दिवशी कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात करणं हे हिंदू धर्मानुसार शुभ मानलं जातं. यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक मराठी कलाकारांनी नव्या घरात गृहप्रवेश केला. तर, काही कलाकारांनी नवीन गाडी खरेदी करत चाहत्यांना सुखद दिल्याचं पाहायला मिळालं.
आता मराठी कलाविश्वातील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याने चाहत्यांबरोबर एक खास आनंदाची बातमी शेअर केली आहे. या अभिनेत्याने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर त्याच्या नव्या बिझनेसची घोषणा केली आहे. या अभिनेत्याचं नाव आहे अभिजीत केळकर.
विविध मराठी मालिका, चित्रपटांमुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिजीने नुकतीच त्याच्या नव्या व्यवसायाची घोषणा केली आहे. मात्र, अभिनेत्याचा हा व्यवसाय कपड्यांचा किंवा हॉटेल वगैरेचा नसून अभिजीतने पारंपरिक मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. भारतीय स्वयंपाकात मसाल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा मसाला उत्पादक आणि निर्यातदार आहे. त्यामुळे, स्वयंपाक घरातील मसाल्यांचं महत्त्व लक्षात घेऊन अभिजीतने हा पारंपरिक व्यवसाय सुरू केला आहे.
अभिजीतच्या मसाल्याच्या ब्रँडचं नाव आहे अस्सल केळकर मसाले! “प्रत्येक घासात अस्सल चव…गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर माझा स्वतःचा मसाल्याचा ब्रँड घेऊन मी तुमच्या भेटीला आलोय… तुमचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि प्रतिसाद हवाय.. गणपती बाप्पा मोरया!” अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्याने ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे.
मेघा धाडे, सुकन्या मोने, अभिजीत खांडकेकर, पल्लवी पाटील यांसारख्या अनेक अभिनेत्रीने या पोस्टवर कमेंट्स करत अभिजीतला त्याच्या नव्या व्यवसायासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अभिजीत केळकरबद्दल सांगायचं झालं, तर मराठी मालिकांसह आजवर ‘काकस्पर्श’, ‘बालगंधर्व’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ अशा बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
