Marathi Actor Shaky Song Video : सोशल मीडियावर एखादा ट्रेंड अगदी वाऱ्यासारखा पसरतो. मग ते गाणं असो किंवा एखादी कृती. सोशल मीडियावर अनेक जण एखाद्या गोष्टीचं एकामागून एक अनुकरण करतात आणि बघता बघता त्याचा ट्रेंड होतो. असाच सोशल मीडियावर सध्या एक ट्रेंड सुरू आहे, तो म्हणजे संजू राठोडचं ‘शेकी’ या गाण्याचा.
संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ आणि ‘काली बिंदी’ या गाण्यांनी महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं. त्यानंतर त्याचं ‘शेकी’ हे नवीन गाणं सध्या सगळीकडे लोकप्रिय ठरत आहे. संजूच्या या गाण्यात ‘बिग बॉस’ फेम ईशा मालवीयही आहे. एप्रिल महिन्यात प्रदर्शित झालेल्या या गाण्याला अवघ्या दोन महिन्यांत चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.
संजू ‘शेकी’ गाण्यावर बॉलीवूडसह अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या डान्सचे व्हिडीओ शेअर केले आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे, हा व्हिडीओ आहे अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रचा. मराठी मालिका आणि चित्रपटामधून अभिजीत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनयाने चर्चेत राहणारा अभिजीत सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो.
अभिजीत श्वेतचंद्र इन्स्टाग्राम व्हिडीओ
सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच अभिजीतने त्याचा लेकाबरोबर ‘शेकी’ गाण्यावर थिरकल्याचा क्युट व्हिडीओ शेअर केला आहे. अभिजीतने त्याच्या चिमुकल्या लेकाबरोबर ‘शेकी’ गाण्यावर ठेका धरला आहे आणि हा व्हिडीओ सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
या व्हिडीओमध्ये अभिजीतने चिमुकल्या मुलाला पोटाशी धरलं आहे आणि त्याला घेऊन तो ‘शेकी’ गाण्यावर थिरकत आहे. बाप-लेकाचा हा क्युट बॉण्ड पाहून अनेकांनी या व्हिडीओचं कौतुक केलं आहे. तसंच चाहत्यांनी या व्हिडीओखाली कमेंट्स करत त्यांना व्हिडीओ आवडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, अभिजीतबद्दल बोलायचं झाल्यास त्याने ‘नवे लक्ष्य’ ‘शुभविवाह’, आई तुळजाभवानी या मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय अभिनेता ‘सुभेदार’ आणि ‘शिवरायांचा छावा’ अशा काही चित्रपटांमध्येही झळकला आहे. यावर्षी तो बाबा झाला असून त्याने लेकाचं नाव ‘अर्शिव’ असं ठेवलं आहे.