Marathi Actor On Bigg Boss Marathi Entry : ‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो आहे. वादविवाद, भांडण आणि नवनवीन टास्कमुळे हा शो प्रेक्षकांना चांगलाच आवडतो. सध्या ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू आहे. घरातील स्पर्धकांमुळे हा शो सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे. त्यात नुकतीच शोमध्ये तीन स्पर्धकांची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

अनेक चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांना ‘बिग बॉस’च्या खेळात पाहण्याची इच्छा असते. अशीच इच्छा एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या चाहत्यांनाही व्यक्त केली. हा अभिनेता म्हणजे अजिंक्य राऊत. टीव्ही मालिका आणि चित्रपटांमधून अजिंक्यने आपल्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

मालिका आणि चित्रपटांनंतर अजिंक्यला ‘बिग बॉस’ या शोमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. सध्या बिग बॉस सुरू आहे आणि यात घरात तिघांनी वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे या शोमध्ये अजिंक्यसुद्धा वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी होणार का? असं त्याला एका चाहत्याने विचारलं. यावर अजिंक्य नेमकं काय म्हणालाय? चला जाणून घेऊ…

‘बिग बॉस’मध्ये जाण्याबद्दल अजिंक्य म्हणाला…

अजिंक्यने नुकताच इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी प्रश्नोत्तरांच्या सेगमेंटमध्ये त्याला चाहत्यांनी ‘बिग बॉस’बद्दल प्रश्न विचारला. ‘बिग बॉस मराठी’मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून जाणार का? चाहत्याने विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर देताना अजिंक्य म्हणाला, “नाही! प्रामाणिकपणे सांगायचं तर मी ‘बिग बॉस’मध्ये कधीच जाणार नाही”. तर आणखी एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना अजिंक्य म्हणाला, “बिग बॉसमध्ये कदाचित पाहुणा म्हणून जाईन, पण स्पर्धक म्हणून नक्कीच जाणार नाही.”

actor ajinkya raut instagram story
अजिंक्य राऊत इन्स्टाग्राम स्टोरी
ajinkya raut instagram story
अजिंक्य राऊतची इन्स्टाग्राम स्टोरी

अजिंक्य राऊतच्या कामाबद्दल थोडक्यात…

अजिंक्यच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने ‘मन उडू उडू झालं’, ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’, विठु माऊली’ या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तसंच तो ‘टकाटक’, ‘कन्नी’सारख्या सिनेमांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच तो ‘अभंग तुकाराम’ सिनेमात पाहायला मिळालं होता. यात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ६’मधून काही स्पर्धकांची एक्झिट झाली आहे. तर नुकतीच हिंदी टीव्ही अभिनेत्री रेवा कौरसे, मॉडेल संस्कृती साळुंके आणि मराठी अभिनेता संकेत पाठक यांची वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री झाली आहे. आता या तीन नवीन वाइल्ड कार्ड स्पर्धकांच्या येण्यानं ‘बिग बॉस’च्या घरात पुढे काय घडणार, याचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे.