Akshay Kelkar 2nd New Home In Mumbai : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता आणि लोकप्रिय मराठी अभिनेता अक्षय केळकरने काही वर्षांपूर्वीच मुंबईत हक्काचं घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली होती. आता अक्षयने नुकतंच मुंबईत दुसरं घर खास त्याच्या पत्नीला भेट देण्यासाठी खरेदी केलं आहे. यासंदर्भात त्याच्या पत्नीने खास पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
अक्षय केळकर वैयक्तिक आयुष्यात गेल्यावर्षी ९ मे २०२५ रोजी लग्नबंधनात अडकला. आज त्याच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेत्याने आपल्या पत्नीला ड्रीम होम गिफ्ट केलं आहे. नव्या घरातील गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत अक्षयची पत्नी साधना काकतकरने खास पोस्ट लिहिली आहे.
साधना लिहिते, “डिअर नवरोबा…मुंबईत स्वत:चं घर घेणं हे कधीच सोपं नव्हतं. पण, तू हे शक्य करून दाखवलंस. आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी तू मला हे ड्रीम होम गिफ्ट म्हणून दिलंस…आणि काय हवं? तू माझ्या सगळ्या इच्छा पुरवल्यास…तू खरंच वेडा आहेस…तुझ्याशिवाय मी माझ्या अस्तित्वाची कल्पनाही करू शकत नाही. माझे सगळे निर्णय मी तुझ्याशी चर्चा करून कधी घेऊ लागले हे सुद्धा मला समजलं नाही. तू मला लढायला शिकवलंस…मी कधीही हार मानू नये म्हणून तू नेहमी माझ्या पाठिशी राहिलास. याशिवाय, एक कणखर आणि स्वावलंबी व्यक्ती म्हणून तू मला घडवत आहेस…तुला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!”
पत्नीच्या या पोस्टवर अक्षय रिप्लाय देत लिहितो, “तू आनंदी राहणं डिझर्व्ह करतेस…तुझं स्वप्न सत्यात उतरताना पाहणं यापेक्षा सुखद भावना दुसरी काय असू शकते? आपण दोघे मिळून भविष्यात आपली सगळी स्वप्न साकार करू त्याची ही फक्त सुरुवात आहे. तू माझ्यावर नेहमी विश्वास ठेवलास…मला साथ दिलीस, याबद्दल तुझे आभार! आणि मला तुझा कायम अभिमान वाटत राहील…माय वाइफ!”
दरम्यान, अक्षय केळकरच्या या पोस्टवर मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी कमेंट्स करत या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. नुकतीच अक्षयच्या या नव्या घरी गृहप्रवेश पूजा देखील पार पाडली आहे. याचे फोटोही साधनाने शेअर केले आहेत.
