Anshuman Vichare New Home : यंदाच्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक मराठी कलाकारांनी नवीन घर खरेदी केल्याचं पाहायला मिळालं. लोकप्रिय अभिनेता अंशुमन विचारेने देखील गुढीपाडव्याला नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी सर्वांना सांगितली होती. आता अभिनेत्याने या नव्या घरात गणेश पूजन केलं आहे. याचा खास व्हिडीओ अभिनेत्याने व त्याच्या पत्नीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमांमधून अभिनेता अंशुमन विचारे घराघरांत लोकप्रिय झाला. त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या अभिनेता सोशल मीडियावर सक्रिय राहत त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंशुमन आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या नव्या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
अंशुमन विचारेचं हे तिसरं घर आहे. त्याची पत्नी पल्लवी या नव्या घराची झलक चाहत्यांबरोबर शेअर करत लिहिते, “अन्वीने म्हणजेच आमच्या लेकीने छोटीशी चूल बनवली होती…यानंतर आम्ही एकत्र गणेशपूजन केलं. अधिक महिना सुरू होतोय त्यामुळे ही पूजा आम्ही आधीच करून घेतली.” सध्या अंशुमनच्या घरी इंटिरियरचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. हे काम पूर्ण झाल्यावर तो आपल्या कुटुंबासह नव्या घरात गृहप्रवेश करणार आहे.
अंशुमनने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या पहिल्या घराची आठवण सांगितली होती. पहिलं घर खरेदी करताना समोरच्या व्यक्तीला ८ दिवसांत २० लाख रुपये द्यायचे होते. तेव्हा बायकोने एफडी मोडली होती. एफडी मोडून ५ लाख रुपये जमा झाले. तसेच तेव्हा काही मित्रांनी सुद्धा मदत केली होती असं त्याने सांगितलं.
दरम्यान, अंशुमन विचारेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, आतापर्यंत त्याने ‘पोश्टर बॉईज’, ‘धिंगाणा’, ‘संघर्ष’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’, ‘श्वास’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय अभिनेत्याने रंगभूमीवर सुद्धा काम केलेलं आहे.
