Anshuman Vichare New Home : आपलं हक्काचं घर असावं, आपण आपलं घर सुंदर पद्धतीने आणि आपल्याला हवं तसं सजवावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. सध्याच्या घडीला मध्यमवर्गीय लोकांना मुंबईसारख्या ठिकाणी हक्काचं घर घेणं इतकं सोपं राहिलेलं नाहीये. बँकेचा हप्ता, दिवसरात्र मेहनत-कष्ट करून आपल्याला अनेक गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. मराठी सिनेविश्वात सुद्धा असे बरेच कलाकार आहेत, ज्यांना आपलं ड्रीम होम येत्या काही दिवसांत खरेदी करायचं आहे. तर, अनेकांनी यावर्षी नव्या घराची स्वप्नपूर्ती झालेली आहे. यामध्ये लोकप्रिय अभिनेता अंशुमन विचारे याचंही नाव आहे.
यंदा ( मे २०२६ ) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अंशुमन विचारेने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज त्याच्या तमाम चाहत्यांना दिली होती. “आजच्या खास दिवशी आमच्या आयुष्यात आलेलं हे तिसरं घर आहे”, असं कॅप्शन अभिनेत्याने या पोस्टला दिलं होतं. यानंतर अंशुमन व त्याच्या कुटुंबीयांनी नव्या घरात इंटिरिअरचं काम सुरू केलं. आता त्यांचं संपूर्ण घर एका नव्या रुपात तयार झालं असून अभिनेत्याने याची पहिली झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
नवीन घर दाखवताना “देखो मैंने देखा है ये एक सपना…फूलों के शहर में है घर अपना…” या गाण्यावर अंशुमन, त्याची पत्नी पल्लवी आणि लाडक्या लेकीने खास डान्स केला आहे. अंशुमनच्या नव्या घराचा हॉल खूपच प्रशस्त आहे. हॉलमधल्या टीव्ही युनिट कॅबिनेटमध्ये वरच्या बाजूला अभिनेत्याने आजवर जिंकलेल्या पुरस्कारांच्या ट्रॉफीजची झलक पाहायला मिळत आहे. याशिवाय हॉलमध्ये ऑफ व्हाइट रंगाचा सुंदर असा सोफा ठेवण्यात आला आहे.
अंशुमनच्या नव्या घरात त्याच्या लाडक्या लेकीसाठी सुद्धा खास बेडरूम आहे. अन्वीची ही क्युट बेडरूम व्हिडीओमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्याची पत्नी हा व्हिडीओ शेअर करत लिहिते, “आम्ही एकेकाळी हे स्वप्न पाहिलं होतं…आणि आता ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आमचं स्वत:चं घर, इथली प्रत्येक जागा आमच्यासाठी स्पेशल आहे. आमच्या या नव्या घरात तुमचं स्वागत आहे.”
अंशुमनच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “किती सुंदर घर आणि तुम्हा तिघांची सुंदर फॅमिली”, “अभिनंदन तुमचं”, “नव्या घरासाठी शुभेच्छा”, “सुंदर फॅमिली आणि घर”, “घर छान सजवलंय तुम्ही” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
