Arun Kadams Daughter Shares Memories: मराठी अभिनेते अरुण कदम हे त्यांच्या विनोदी शैलीसाठी ओळखले जातात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून सध्या ते प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत.
नुकतीच अरुण कदम यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांच्या लेकीसह त्यांनी हजेरी लावली होती. या मुलाखतीत अरुण कदम व त्यांची लेक सुकन्या यांनी अनेक किस्से सांगितले. अरुण कदम यांनी त्यांची लेक अभिनय क्षेत्रात काम का करत नाही, यावरदेखील वक्तव्य केले. याबरोबरच त्यांनी लेकीच्या बालपणीचे किस्से सांगितले.
“मी आणि माझी आई शिमल्याला गेलो….”
सुकन्यानेदेखील वडिलांनी करिअरमध्ये कसा पाठिंबा दिला, याबरोबरच एकदा ती आईसह शिमल्यामध्ये अडकली असताना वडिलांनी कशी मदत केली होती, याची आठवण सांगितली. सुकन्या म्हणाली, “मी आणि माझी आई शिमल्याला गेलो होतो. त्यावेळी खूप बर्फ पडत होता. तिथे सगळं बंद झालं होतं. आम्ही एका हॉटेलमध्ये अडकलो होतो. पप्पांचे शूटिंग सुरू होतं, त्यामुळे ते आमच्याबरोबर आले नव्हते.”
“त्यावेळी कोणाकोणाला फोन करून, मला माहीत नाही त्यांनी काय केलं. आमच्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं. मला माहीत नाही त्यांनी ते कसं केलं. माझ्यासाठी माझे वडील कुठल्याही परिस्थितीत हिरोच आहेत.”
पुढे सुकन्याने अरुण कदम म्हणजेच वडिलांमुळे लोक मला ओळखायचे, त्यावेळी आनंद व्हायचा असे म्हटले. सुकन्या म्हणाली, “शाळेत मला वडिलांमुळे इतर लोक ओळखायचे, त्यामुळे खूप छान वाटायचं. जेव्हा आम्ही बाहेर जातो, तेव्हा लोक येतात, त्यांना भेटतात. त्या लोकांच्या मनात पप्पांविषयी आदर दिसतो, तेव्हा खूप छान वाटतं”, असे म्हणत अरुण कदम यांच्या मुलीने आनंद व्यक्त केला.
सुकन्या ही ग्राफिक डिझाइनर आहे तसेच ती भरतनाट्यम डान्सरदेखील आहे. वडिलांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ती या क्षेत्रात काम करू शकते, असे तिने सांगितले. याबरोबरच सुकन्या सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची मोठी संख्या असल्याचे दिसते.
दरम्यान, अरुण कदम यांनी त्यांची लेक अभिनय क्षेत्रात का नाही, यावरदेखील वक्तव्य केले. ते म्हणाले की आम्हाला लहानपणीच ती उत्तम डान्स करू शकते हे समजले होते. त्यामुळे आम्ही तिला भरतनाट्यम शिकवले. तिच्याकडे अभिनय कौशल्य आहे की नाही माहित नाही, पण ती उत्तम डान्स करते, असे म्हणत अरुण कदम यांनी लेकीचे कौतुक केले.