Bhau Kadam Daughter Mrunmayee Kadam Graduation Day : विनोदाचं अचूक टायमिंग साधत मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजेच भाऊ कदम. खऱ्या आयुष्यात अगदी शांत पण, भाऊंनी मंचावर एन्ट्री घेताच एक वेगळाच माहोल क्रिएट होतो. आजवर मराठीसह असंख्य हिंदी कलाकारांनी सुद्धा त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. भाऊ कदम यांची मुलगी देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. त्यांच्या मुलीचं नाव आहे मृण्मयी, ती प्रचंड हुशार आहे.
मृण्मयी कंटेट क्रिएटर तर आहेच याशिवाय काही वर्षांपूर्वी तिने स्वत:चा लहानसा हेअर Scrunchies चा बिझनेस देखील सुरू केला होता. यावेळी ती अवघ्या १८ वर्षांची होती. मुंबईतील नामांकित महाविद्यालयातून कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केल्यावर…. मृण्मयी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली. गेल्या काही वर्षांपासून ती परदेशात आपलं शिक्षण पूर्ण करतेय.
मृण्मयी, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (United States Of America) येथे उच्च शिक्षणासाठी गेली होती, यावेळी तिने शिक्षणाबरोबरच एका नामांकित कॅफेत नोकरी सुद्धा केली. नोकरी करून तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.
मृण्मयीचं शिक्षण आता पूर्ण झालं असून, नुकताच तिच्या महाविद्यालयात ‘ग्रॅज्युएशन डे’ पार पडला. यावेळचा खास व्हिडीओ मृण्मयीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या समारंभासाठी तिने खास तयारी केली होती. सुंदर गुलाबी शेडचा लेहेंगा, त्यावर डिझायनर ब्लाउज टॉप, यावर सुंदर मोठे कानातले या लूकमध्ये मृण्मयी खूपच सुंदर दिसत होती. याशिवाय मृण्मयीने हातात लेहेंग्यावर मॅचिंग होतील अशा बांगड्या देखील घातल्या होत्या. मृण्मयीला या गोड लूकमध्ये पाहून तिच्या सगळ्याच मैत्रिणी थक्क झाल्या होत्या. सर्वांनी तिचं कौतुक केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
“अमेरिकेत आल्यावर मी या काही खास लोकांच्या संपर्कात आले, ज्यांनी माझी मनापासून काळजी घेतली. प्रत्येक क्षणी मला साथ दिली…या सगळ्याजणी माझ्या पाठिशी उभ्या राहिल्या. हेच आहे माझं USA मधील कुटुंब!” असं कॅप्शन मृण्मयीने या व्हिडीओला दिलं आहे.
मृण्मयीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “खूप सुंदर”, “तुझ्या आई-बाबांना आज नक्कीच तुझा फार अभिमान वाटत असेल”, “अरे किती सुंदर दिसतेय…तुझं खूप अभिनंदन” अशा प्रतिक्रिया तिच्या पोस्टवर आल्या आहेत. आता मृण्मयी शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात केव्हा परतणार याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
