Chinmay Mandlekar in Zee Marathi Sanai Chaughade Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर जवळपास १२ वर्षांपूर्वी ‘तू तिथे मी’ ही मालिका प्रसारित केली जायची. या मालिकेने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. साधीभोळी मंजिरी, तिचा विचित्र-संशयी नवरा ही मालिकेची हटके गोष्ट सर्वत्र लोकप्रिय झाली होती. ‘तू तिथे मी’ या मालिकेचं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर उभी राहते मंजिरी-सत्यजितची जोडी…या भूमिका अनुक्रमे लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारल्या होत्या.
आता १२ वर्षांनी सत्यजित पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता तो कोणत्या मालिकेत एन्ट्री घेणार जाणून घेऊयात…
‘तू तिथे मी’ या मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे आता सत्यजितला पुन्हा एकदा नव्या मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. हा सत्यजित ‘झी मराठी’च्या ‘सनई चौघडे’ मालिकेत एन्ट्री घेणार आहे.
चिन्मय मांडलेकर ‘सनई चौघडे’ मालिकेत एन्ट्री घेणार
“अगदी योग्य मुहूर्तावर होणार सत्यजितची दणक्यात एन्ट्री!” असं कॅप्शन या पोस्टला झी मराठीने दिलं आहे. मात्र, यामध्ये चिन्मय मांडलेकरचा चेहरा अद्याप रिव्हिल करण्यात आलेल नाहीये. पण, या व्हिडीओमध्ये अभिनेत्याची लहानशी झलक पाहायला मिळतेय…त्यामुळे प्रेक्षकांनी आपल्या लाडक्या सत्यजितला अगदी अचूक ओळखलं आहे.
या व्हिडीओमध्ये चिन्मय मांडलेकर एकदम डॅशिंग लूकमध्ये एन्ट्री घेताना दिसतोय. तो ‘सनई चौघडे’ मालिकेत पुन्हा एकदा सत्यजित ही भूमिका साकारणार आहे. सध्या या मालिकेत शर्वरी नव्या नोकरीच्या शोधात असल्याचं पाहायला मिळतंय. आता शर्वरीचा नवा बॉस सत्यजित असणार का? हे लवकरच स्पष्ट होईल.
नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. चिन्मय मांडलेकरचं कमबॅक पाहून चाहत्यांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आहे. प्रेक्षक सुद्धा पुन्हा एकदा चिन्मयला पाहून थक्क झाले आहेत. दरम्यान, ‘सनई चौघडे’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सनई चौघडे दररोज रात्री ८:३० वाजता प्राइम स्लॉटला ‘झी मराठी’वर प्रसारित केली जाते.
