Digamber Naik Reveals Removed From Lakshya Serial: संघर्ष हा काही कुणाला चुकलेला नाही. प्रत्येकजण आयुष्यात संघर्ष करतच असतो. कलाकारांच्या आयुष्यातही असे अनेक संघर्षाचे प्रसंग येत असतात. असाच एक प्रसंग अभिनेते दिगंबर नाईक यांनी सांगितला आहे.
रात्री अचानक त्यांना एका मालिकेतून काढण्यात आलं होतं. याबद्दल त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला. मराठी नाटक, मालिका, चित्रपट तसेच ‘बिग बॉस मराठी’सारख्या शोमधून दिगंबर नाईक हे नाव घराघरांत पोहोचलं आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संघर्षाबद्दल सांगितलं.
“शोमधून रात्री पावणे बारा वाजता काढून टाकलं”
यावेळी ते म्हणाले, “एका शोमधून मला रात्री पावणे बारा वाजता काढून टाकलं. त्यात हवालदाराची भूमिका होती. मी त्यासाठी केसही कापले होते. तयारी केली होती. अभिनेता म्हणून आपण शिकतच असतो. मी करतो ते समोरचा करू शकेल असं नाही आणि तो जे करतो ते मी करूच शकत नाही असंही नाही. एखाद्या मालिकेत घेतलं नाही तर निर्माता सांगतो चॅनेल नको म्हणालं आणि चॅनेलला विचारल्यानंतर ते सांगतात निर्माते ऐकत नाही. याची तर मला सवयच झाली आहे.”
“सेलिब्रिटी असूनही माझा संघर्ष संपला नव्हता”
यानंतर ते म्हणाले, “पाच-सात दिवसांनी मला कळलं की, माझ्या जागी कुणीतरी दुसरा काम करत आहे. त्याचं मला वाईट वाटलं. ‘लक्ष्य’ नावाची ती मालिका होती. त्यात मी हवालदाराच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. ‘फू बाई फू’नंतर सेलिब्रिटी असूनही माझा संघर्ष संपला नव्हता. मला ‘लक्ष्य’मधून काढलं याचं कारण – त्यांचं म्हणणं होतं तो ‘फू बाई फू’ करतो, कॉमेडी करतो. मग तो इकडे वारकरी असलेल्या हवालदाराची भूमिका कसा करेल? मला गरज असताना ती भूमिका मिळाली नव्हती म्हणून वाईट वाटलं. पण हरकत नाही, असं होत राहतं.”
“मालवणी माणसाला अभिमान असता, तर…”
यानंतर दिगंबर यांना मालवणी भाषेमुळे पहिला सन्मान कधी मिळाला, असे विचारण्यात आले. यावर दिगंबर नाईक म्हणाले, “माझ्या कोकणातल्या प्रेक्षकांना वाईट वाटेल, पण मालवणी अभिनेता म्हणून सन्मान असा झाला नाही. म्हणजे मी ‘फू बाई फू’ शो करत होतो तेव्हा तिथे राकेश सारंग होते ते कोकणातले होते, परीक्षक निर्मिती सावंतसुद्धा कोकणातल्याच. पण त्यांच्यापेक्षा जास्त कौतुक माझं स्वप्नील जोशीने केलं होतं. वाईट वाटेल. पण मी स्पष्टवादी आहे. मला हे बोलताना काही फरक पडत नाही. मला आता ‘वस्त्रहरण’ नाटक केल्यानंतरच प्रेक्षकांनी मालवणी अभिनेता म्हणून स्वीकारलं आहे. मालवणी निर्मात्याला किंवा मालवणी माणसालाच मालवणी माणूस नको असतो. नाहीतरी मी कायम कामात व्यग्र राहिलो असतो. आता ज्या मालिका सुरू आहेत त्याचे निर्माते मालवणी आहेत. जर त्या मालवणी माणसाला अभिमान वाटला असता, तर हा मालवणी (दिगंबर नाईक) घरी बसलाच नसता. अभिमानही जाऊदे, आत्मीयता जरी वाटली असती तरी चाललं असतं.”
यापुढे ते ‘लक्ष्य’ या मालिकेबद्दल म्हणाले, “आदेश बांदेकर मालवणीच आहे ना… माझा मित्रच आहे तो… रात्री पावणे बारा वाजता मला ज्या मालिकेतून काढलं ती ‘लक्ष्य’ मालिका त्याचीच होती. तेव्हा चॅनेल हेड श्रावणी देवधर होत्या. त्यांचं मत असं होतं की हा कॉमेडी करतो, हा गंभीर भूमिका कशी करेल? अर्थात त्यांचं हे मत असू शकतं. पण तेव्हा आदेश बांदेकरांना असं वाटलं नाही का, की हा मालवणी मुलगा आहे आणि मीसुद्धा मालवणी आहे. चला माझ्या मालिकेत याला घेऊया. आता मालवणी मालिकेतच मालवणी लोक नको असतात.”
