Marathi Actor : मराठी इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा काम असतं तर, कधी असंख्य प्रयत्न करूनही अपेक्षित भूमिका मिळत नाहीत. लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. या अभिनेत्याकडे २०२५ मध्ये फारसं काम नव्हतं. पण, यंदा त्याची नवीन वर्षाची सुरुवात खऱ्या अर्थाने चांगली झालीये कारण, अभिनेत्याला एका नव्हे तर दोन मालिकांमध्ये झळकण्याची संधी मिळाली आहे. हा अभिनेता कोण आहे जाणून घेऊयात…

‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेतून काही दिवसांपूर्वीच शंतनू गंगणेने एक्झिट घेतली. तो मालिकेत ‘मोहन’ ही भूमिका साकारत होता. आता शंतनूने मालिका सोडल्यावर मोहनच्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट म्हणून ‘पारू’मध्ये अभिनेता स्वप्नील आजगावकरची एन्ट्री झाली आहे.

स्वप्नील आजगावकरला नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कामासंदर्भात लॉटरी लागली आहे. ही आनंदाची बातमी अभिनेत्याने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत सर्व चाहत्यांना सांगितली आहे. ‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेसह स्वप्नील आजगावकर ‘स्टार प्रवाह’च्या ‘वचन दिले तू मला’ मालिकेत सुद्धा झळकणार आहे.

याबद्दल स्वप्नील आजगावकर म्हणतो, “नवीन वर्षाची सुरुवात एका सुंदर बातमीने…२०२५ हे वर्ष कामाच्या दृष्टीने खूपच कठीण होतं. संयम, विश्वास आणि स्वत:वरील भरवसा टिकवून ठेवणं हेच शिकवत गेलं…पण, २०२६ या नव्या वर्षाने सुरुवातीलाच उत्तर दिलं. तेही दोन शोच्या रूपात… ‘स्टार प्रवाह’वरील ‘वचन दिले तू मला’ आणि ‘झी मराठी’वरील ‘पारू’. मी मनापासून कृतज्ञ आहे…या संधीसाठी, या विश्वासासाठी तसेच या नव्या सुरुवातीसाठी. नवीन वर्ष, नवीन काम आणि अजून जास्त प्रामाणिकपणे मेहनत करण्याची जबाबदारी. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादांची गरज कायमच आहे.”

दरम्यान, ‘वचन दिले तू मला’ ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित केली जाते. तसेच ‘पारू’ मालिका झी मराठीवर रात्री ११ वाजता प्रक्षेपित केली जाते.