‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अभिनेता हार्दिक जोशीला घराघरांत ‘राणादा’ म्हणून ओळखलं जातं. २०१६ मध्ये ही मालिका ऑन एअर झाली होती. आजही या मालिकेबद्दलची प्रत्येक आठवण प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. राणादाच्या भूमिकेसाठी हार्दिकने जवळपास ३०-३२ किलो वजन वाढवलं होतं…प्रेक्षकांना गेली अनेक वर्षे त्याला तशाच रुपात पाहायची सवय होती. पण, आता हार्दिकने जवळपास २५ किलो वजन घटवल्यामुळे प्रेक्षकही थक्क झाले आहेत.
हार्दिक जोशी ‘कर्मा टॉक्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “जोपर्यंत तुमच्या पायात ताकद आहे…तोपर्यंत तुम्ही काम केलंच पाहिजे. मग, तुम्ही ११-१२ तास काम करा किंवा २४ तास काम करा…हीच वेळ आहे. हात-पाय थकल्यावर ते शक्य होत नाही. त्यामुळे आताच मनापासून काम करा. पण, याचबरोबर तुम्ही तुमच्या प्रकृतीकडेही लक्ष द्या. आता काही लोक असं म्हणतात, अरे मी १८ तास काम करतो. पण, हे १८-२० तास काम केल्यावर तुम्हाला प्रकृतीकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. जे काही काम करताय ते आनंदाने करा. कारण, आपण जे काम करतोय त्यात आपण समाधानी, आनंदी असणं गरजेचं आहे. लोकांना दाखवून काय मिळणार आहे? सेटवर सुद्धा माझी नेहमी मस्ती सुरू असते. मला हसत-खेळत शूट करायला आवडतं.”
फिटनेसबद्दल हार्दिक म्हणाला, “मला व्यायामाची प्रचंड आवड आहे आणि आता हे सर्वांनाच माहिती आहे. मी कुठेही शूटिंगसाठी जायचं असेल तर, टीमला विनंती करून एक ते दोन दिवस आधीच लोकेशनवर जातो. तिथे जाऊन मी आधी जिम शोधतो. आता आपला महाराष्ट्र फिटनेसच्या बाबतीत इतका पुढे गेलाय की, तुम्हाला आता खेडेगावातही सहज जिम मिळेल…मग ती जिम छोटी का असेना. एकंदर मी जिमला ब्रेक देत नाही. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या वेळेला सुद्धा मी १८ तास शूट केल्यानंतर पुढचे २ तास तरी जिमला जायचो. काहीही झालं तरी मी व्यायाम करणं सोडत नाही…मग वजन वाढवायचं असेल किंवा कमी करणं असेल… व्यायाम केल्याने मला फ्रेश वाटतं. आता मी ठाण्यात राहतो, तिथे बिल्डिंगमध्येच जिम आहे. तर, आता ट्रॅव्हलिंगचा वेळही वाचतो.”
…म्हणून २५ किलो वजन घटवलं!
“आजही अनेक चाहते विचारतात अरे, राणादा तुम्ही बारीक झालात. पण, मीच नाहीतर आपल्या मराठी इंडस्ट्रीतले अनेक कलाकार फिटनेस, व्यायामाकडे लक्ष केंद्रीत असल्याचं पाहायला मिळत आहे. २०१६ मध्ये मी राणादाच्या भूमिकेसाठी जवळपास ३० ते ३२ किलो वजन वाढवलं होतं. आता २०२६ सुरू आहे…दहा वर्षे पूर्ण झाली, त्यामुळे आता आपल्यातही वेगळेपणा, तो बदल जाणवला हवा. म्हणून मी जवळपास २५ किलो वजन कमी केलेलं आहे.” असं हार्दिकने सांगितलं. तसेच राणादाची भूमिका साकारण्याआधी वजन कमीच होतं असंही हार्दिक म्हणाला.
“मला कोणतंही व्यसन नाहीये, मी फार पार्टी वगैरेला जात नाही. मला माझ्या घरातल्या लोकांबरोबर वेळ घालवायला खूप आवडतं, याशिवाय मला फिरण्याची आवड आहे. मी आठवीत असल्यापासून व्यायाम करतो.” असं हार्दिकने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत फिटनेसविषयी म्हटलं होतं.
