अलीकडच्या काळात सगळेच सेलिब्रिटी आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. व्यायाम, योग याचप्रमाणे दररोजचा आहार कसा आसावा, जेवणात कोणत्या गोष्टी असाव्यात, कोणते पदार्थ खाऊ नयेत अशापद्धतीची संपूर्ण दिनचर्या या सेलिब्रिटींची ठरलेली असते. अनेक कलाकारांनी नॉनव्हेज, दुग्धजन्य पदार्थ कायमचे बंद केले आहेत. तर, काही कलाकार फास्टिंग डाएट करतात…म्हणजेच संध्याकाळी ७ ते सकाळी ७ यादरम्यान काहीच खायचं नाही, फास्टिंग करून फक्त ब्लॅक कॉफी, सॅलड खायचं आणि यादरम्यान पाण्याचं सेवन सर्वाधिक करावं. बॉलीवूडपासून ते मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार अशाप्रकारचं डाएट फॉलो करतात.
सध्या मराठी मनोरंजन विश्वातील अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झाले आहेत. हा अभिनेता म्हणजेच हरीश दुधाडे. ‘फर्स्टक्लास दाभाडे’, ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’, ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’ अशा विविध सिनेमांमध्ये झळकलेला लोकप्रिय अभिनेता हरीश दुधाडेने आपल्या फिटनेसकडे लक्ष केंद्रीत करून स्वत:चं वजन घटवलं आहे.
हरीशने गेल्या महिन्याभरात तब्बल ११ किलो वजन घटवलं आहे. याबाबत ‘राजश्री मराठी’ने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही स्ट्रिक्ट डाएटशिवाय जीवनशैलीत थोडेफार बदल करून हरीशने एका महिन्यात हे वजन कमी केलं आहे. दुपारच्या जेवणात अभिनेता नाचणीची भाकरी, भात आणि भालेपाज्या खायचा. तर रात्रीच्या जेवणात प्रोटिनयुक्त आहार घ्यायचा.
हरीशने ‘ट्रान्सफॉर्मेशन इज द Key’ म्हणत त्याच्या लूकचे Before-After फोटो शेअर केले आहेत. चाहते सुद्धा त्याचं हे कमालीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क झाले आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये, “तुझी संपूर्ण दिनचर्या शेअर कर” असंही हरीशला सांगितलं आहे. “सॅल्युट…इतक्या कमी वेळात हे वजन कसं काय कमी केलं?”, “वाह वाह मस्तच”, “हरीश इज बॅक..भारी ट्रान्सफॉर्मेशन”, “वाह…एक महिन्यात कमाल केली”, “सर मस्त दिसताय आता”, “सर तुमचं संपूर्ण रुटिन शेअर करा” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
हरीशच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेता ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये हरीशसह अभिनेत्री दीप्ती केतकर प्रमुख भूमिका साकारतेय.
