Marathi Actor Shares Post On Bigg Boss : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचं बिगुल आता वाजलं आहे. येत्या ११ जानेवारीपासून ‘बिग बॉस मराठी’चं सहावं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या संभाव्य स्पर्धकांची नावंसुद्धा हळूहळू समोर येत आहेत. अशातच एका मराठी अभिनेत्याला एका चाहत्यानं ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याविषयी विचारले असता त्यानं त्याची व्यथाच मांडली.
स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील मल्हार म्हणजेच अभिनेता कपिल होनरावला नुकतंच त्याच्या एका फोटोखालील कमेंट्समध्ये चाहत्यानं ‘भाऊ बिग बॉसमध्ये जाणार की नाही?’, असं विचारलं. ज्यावर अभिनेत्यानं एक सविस्तर पोस्टच लिहिली आहे.
या पोस्टमधून अभिनेत्यानं सोशल मीडियावरील फॉलोअर्स, त्यामुळे मिळणारी कामं, इंडस्ट्रीत न मिळणारी आपलेपणाची वागणूक तसंच अजूनही कामाचा शोध घ्यावा लागत असल्याचं सांगितलं आहे. तरीही आपण हार मानत नसल्याचंसुद्धा त्यानं या पोस्टमधून स्पष्ट केलं आहे. शिवाय एकसारख्याच भूमिका मिळत असल्यानं टाइपकास्ट होऊ नये म्हणून ठरवून काही काळ ब्रेक घेतल्याचंसुद्धा कपिलनं स्पष्ट केलं आहे. या पोस्टमध्ये अभिनेता नक्की काय म्हणालाय? चला जाणून घेऊ…
इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये कपिल होनराव म्हणतो…
‘बिग बॉस’ आता माझ्या आवाक्याबाहेर आहे.
मिलियन्समध्ये फॉलोअर्स कुठून आणू?
ना मी कुठल्या चॅनलचा मुख्य अभिनेता आहे, ना माझे मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत,
ना माझा कुठला PR आहे.
उलट रोज फॉलोअर्स कमी होतायत. जे काही आहे, ते सगळं ऑर्गेनिक आहे.
एका छोट्याशा कॅरेक्टर रोलला तुम्ही इतके प्रेम दिलंत,
मी इथे फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आहे.
मीडियानंही मला खूप प्रेम दिलं, मान दिला, सन्मान दिला.
त्यांनी नेहमीच मला एका प्रसिद्ध सेलिब्रिटीसारखं वागवलं.
इंडस्ट्रीमधून जितकं प्रेम मिळायला हवं होतं, ते अजून मिळालेलं नाही.
कधी कधी तर ते मला असं वागवतात की, “तू आहेस तरी कोण?”
त्यांना मला फक्त एकाच प्रकारच्या भूमिकेत पाहायचं आहे.
टाइपकास्ट होऊ नये म्हणून मी थोडा काळ टेलिव्हिजनपासून दूर आहे.
मी हा टाइपकास्ट तोडायचा प्रयत्न करतोय.
म्हणूनच सगळीकडे एकच रोल करत राहण्यापेक्षा स्वतःला थोडं थांबवून ठेवलं आहे.
इन्स्टाग्रामवरचे माझे सगळे फॉलोअर्स त्या एका ‘मल्हार’मुळे आहेत.
ती भूमिका मी पूर्ण प्रामाणिकपणे साकारली.
आजही मला काम मागावं लागतं,
आजही अनेक कास्टिंग डायरेक्टर्स माझ्या मेसेजला उत्तर देत नाहीत.
माझा संघर्ष अजूनही सुरू आहे… पण याचं दुःख नाही…
कारण हा माझ्या प्रवासाचाच एक भाग आहे.
अभिनेता कपिल होनरावने शेअर केली इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना कपिलनं तो ‘बिग बॉस मराठी’मध्ये प्रवेश करणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलंच आहे. पण तो लवकरच एका मोठ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश देशमुखच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘राजा शिवाजी’ सिनेमात कपिल झळकणार आहे. येत्या मे महिन्यात हा भव्य सिनेमा रिलीज होणार आहे आणि याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
