दरवर्षी २ ऑक्टोबरला गांधी जयंती साजरी केली जाते. महात्मा गांधीजींनी जगाला अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने जाण्याची शिकवण दिली. त्यांच्या महान कार्यामुळे देशातील जनतेने त्यांना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी दिली. आज त्यांच्या जयंतीनिमित्त मराठी अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : “शाळेत उंचीमुळे मला…”, ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “आज तुमच्यासमोर सुवर्णपदक…”
मराठी अभिनेते किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ‘बिग बॉस’ सीझन ४ मध्ये सहभागी झाल्यापासून ते घराघरांत पोहोचले. ‘बिग बॉस’च्या घरात त्यांनी ‘सातारचा बच्चन’ अशी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. अभिनयाबरोबरच ते अनेकदा सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर बेधडक भाष्य करतात. नुकतीच त्यांनी गांधी जयंतीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने यांची पोस्ट
…माणूस दिसायला हडकुळा होता. किरकोळ शरीरयष्टी. छातीचा पिंजरा दिसत होता, पण माझ्या भावा, त्या छातीत असा दम होता की आजबी अख्खं जग त्याला झुकून सलाम करतं! ही होती फक्त विचारांची ताकद. अमेरिका-इंग्लंड-जर्मनी-कोरीया… पृथ्वीवरच्या कुटल्याबी देशात जा…कुट्ट्टंबी… आज गांधीबाबाच्या विचारांनी प्रभावित झालेली, त्यांच्या पुतळ्यापुढं नतमस्तक झालेली माणसं भेटतील!
आपन कित्तीबी वरडुन बोललो – घसा फाडूफाडून बोललो, तरी आपल्या बोलन्यात ‘सत्याचा अंश’ नसंल तर जगाच्या बाजारात त्या बोलण्याला घंटा किंमत मिळत नसती… त्या महात्म्याचा आवाज खनखनीत नव्हता का चालन्यात रूबाब न्हवता.. वाकून काठी टेकत-टेकत हज्जारो लोकांसमोर त्यो यायचा.. पालथी मांडी घालून बसायचा आन बसक्या आवाजात बोलत र्हायचा… आवाजात चढउतार नायत का टाळीबाज-चटपटीत वाक्य नायत… पन त्याच्या विचारात ‘निर्मळ’पना व्हता – शब्दाशब्दात भारतमातेवरची माया व्हती – रक्ताच्या थेंबाथेंबात आपल्या मातीतल्या गोरगरीबांसाठीची आस व्हती – मानवतेची कास व्हती – ‘सत्याची’ ताकद व्हती.. गोळ्या घालून मारला बाबाला… पण तरीबी जित्ता र्हायला.. शत्रूच्या नाकावर टिच्चून. जगातला एकबी देश असा नाय जिथं त्याचा विचार पोचला नाय.
खायचं काम नाय गड्याहो…यांच्या हजार पिढ्या खपत्याल त्यो ‘विचार’ संपवायला पण ‘गांधी’ उसळी मारून वर येतच र्हानार.
सलाम महात्म्या सलाम… कडकडीत सलाम..
किरण माने.
हेही वाचा : केतकी माटेगावकरची आहेत मजेशीर टोपण नावं; अभिनेत्री म्हणाली…
दरम्यान, किरण मानेंच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर सध्या ते कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्यांनी सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारली आहे.