मराठीतील लोकप्रिय अभिनेते किरण माने नेहमी चर्चेत असतात. ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वातून किरण माने घराघरात पोहचले. सामाजिक तसेच राजकीय विषयांवर किरण माने आपली भूमिका परखडपणे मांडताना दिसतात. सोशल मीडियावर किरण माने नेहमी सक्रिय असतात. निरनिराळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. नुकतंच एका कार्यक्रमात किरण मानेंनी लोकशाहीवर मत व्यक्त केलं. किरण मानेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.




व्हिडीओमध्ये किरण माने म्हणाले, “आज आपण लोकसभा निवडणुकांवर परिसंवाद घेतोय. पण, जेव्हा आपल्या रोजच्या जगण्यावर बंधन आली तेव्हा आपण भानावर आलो. तुम्ही तुमच्या घरात काय खायचं, काय पेहराव करायचा, तुम्ही काय बोलायचं, तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरच्या अकाउंटवर काय पोस्ट करायची, तुम्ही दुसऱ्याच्या पोस्टवर काय कमेंट करायची याच्यावर बंधनं यायला लागली आहेत. सगळ्या बाजूने तुम्हाला कुणीतरी बंदिस्त केल्यासारखं झालं आहे. तुम्हाला कशाचातरी धाक आहे. त्यानंतर आपण जागे झालो की हे काय सुरू झालं.”
किरण मानेंच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या माध्यमातून ते प्रसिद्धीझोतात आले. ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत त्यांनी सिंधूताई सपकाळ यांच्या वडिलांची भूमिका साकारली. आता लवकरच त्यांचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून अद्याप या चित्रपटाचे नाव समोर आलेले नाही.