‘झी मराठी’ने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ‘धाकट्या सूनबाई’ या नव्या मालिकेची घोषणा केली. यामध्ये लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलीची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. नवोदित अभिनेत्री चिन्मयी मोरे या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे. यासह ‘धाकट्या सूनबाई’ची निर्मिती ‘कोठारे व्हिजन’कडून केली जाणार आहे.

‘धाकट्या सूनबाई’ या मालिकेच्या पहिल्याच प्रोमोमध्ये याच्या नायिकेचा चेहरा रिव्हिल करण्यात आला होता. त्यामुळे या नव्या मालिकेचा हीरो कोण असेल? याबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता निर्माण झाली होती. सोशल मीडियावर अनेक अभिनेत्यांच्या नावाची चर्चा सुद्धा सुरू होती आणि या सगळ्यात लोकप्रिय अभिनेता मंदार जाधवचं नाव आघाडीवर होतं.

मंदार जाधव लवकरच ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू होत्या. अखेर या सगळ्या चर्चा खऱ्या ठरल्या असून मंदार जाधवने नुकतीच ‘झी मराठी’च्या ‘गोविंदा आला रे’ कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी प्रेक्षकांसमोर मंदार जाधव ‘धाकट्या सूनबाई’मध्ये प्रमुख भूमिका साकारणार असल्याचं रिव्हिल करण्यात आलं आहे. मंदार आणि चिन्मयी यांचा झी मराठीच्या मंचावरील फोटोही सर्वत्र व्हायरल होत आहे.

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून मंदार जाधवला ओळखलं जातं. आजवर त्याने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मात्र, ‘स्टार प्रवाह’च्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेमुळे मंदारला घराघरांत नव्याने एक ओळख मिळाली. आता प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता ‘झी मराठी’वर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.

mandar jadhav
झी मराठीच्या धाकट्या सूनबाई मालिकेत झळकणार मंदार जाधव, पाहा फोटो…

याशिवाय चिन्मयीबद्दल सांगायचं झालं तर, ती नागपूरची आहे. पहिल्यांदाच ती लीड अभिनेत्री म्हणून काम करणार आहे. यापूर्वी चिन्मयी रंगभूमीवरील नाटकांमध्ये आणि ‘प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची’ या मालिकेत झळकली आहे. आता चिन्मयी मोरे ‘धाकट्या सूनबाई’ म्हणून सर्वांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.

दरम्यान, आता ‘धाकट्या सूनबाई’ मालिकेला वाहिनीवर किती वाजताचा स्लॉट मिळणार? ही मालिका दुपारी प्रसारित होणार की रात्री? याबाबत लवकरच झी मराठीकडून अधिकृत माहिती दिली जाईल.