आकाशकंदील, नवीन कपड्यांची खरेदी, संपूर्ण घराची साफसफाई अन् सजावट, आईच्या हातचा फराळ आणि मित्रांसह फटाके फोडण्याची मजा या सगळ्या गोष्टींमुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो. काळानुसार सण साजरे करण्याच्या पद्धती बदलल्या, कामाच्या जबाबदाऱ्या वाढल्या, तरी आपल्या माणसांसोबत सण साजरा करण्याचा आनंद आजही तसाच आहे. झी मराठीवरील ‘धाकट्या सूनबाई’ या मालिकेत वेदांतची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार जाधवने त्याच्या दिवाळीच्या आठवणी, आवडता फराळ आणि यंदाच्या दिवाळीच्या खास नियोजनाविषयी सांगितलं.
मंदार म्हणाला, “माझं संपूर्ण बालपण दादर आणि प्रभादेवीमध्ये गेलं. मी शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेत शिकत होतो. त्यामुळे माझ्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी दादर आणि प्रभादेवीमधल्याच आहेत. लहानपणी सणांचा आनंद अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असायचा आणि त्या आठवणी आजही माझ्या मनाच्या खूप जवळ आहेत. दिवाळी म्हटलं की आकाशकंदील आलाच! मी किल्ला फारसा बनवला नाही, पण आकाशकंदील लावणं आणि घराची सजावट करणं या गोष्टी नक्कीच केल्या आहेत. मी आणि माझा लहान भाऊ मेघन ( लक्ष्मी निवास फेम जयंत ) आम्ही दोघे मिळून घर सजवायचो. आपल्यामुळे आपलं घर सुंदर दिसतंय, याचा आम्हा दोघांनाही खूप आनंद व्हायचा.”
मंदार पुढे म्हणाला, “दिवाळीचा फराळ हा माझ्यासाठी दिवाळीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. घरात फराळ बनवायला सुरुवात झाली की दिवाळी आल्याची चाहूल लागायची. माझे आवडते पदार्थ म्हणजे शंकरपाळ्या, करंज्या आणि चकली. हे सगळे पदार्थ समोर आले की स्वतःला थांबवणं कठीणच होतं. लहानपणी आम्ही हा फराळ नाताळपर्यंत खायचो. एक महिना झाला तरी तो फराळ तितक्याच आवडीने खाल्ला जायचा. कारण वर्षातून एकदाच बनणाऱ्या या फराळाची चवच काही और असते.”
“लहानपणी दिवाळीचा आनंद अगदी साध्या गोष्टींमध्ये असायचा. नवीन कपडे, फराळ, कंदील, घराची सजावट, मित्रांसोबतची धमाल आणि शाळेला मिळणारी सुट्टी या सगळ्यांत खूप आनंद मिळायचा. आता काळ बदलला आहे, आपली जीवनशैली बदलली आहे आणि कामामुळे धावपळही वाढली आहे. पण एक गोष्ट बदललेली नाही, ती म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने आपल्या माणसांसह वेळ घालवण्याची इच्छा. पिढ्या बदलतात, पण सणांमधला आनंद आणि त्यामागची भावना कधीच बदलत नाही.” असं मंदारने सांगितलं.
यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनच्या नियोजनबद्दल मंदार म्हणाला, “मी बरीच वर्षं टेलिव्हिजन इंडस्ट्रीचा भाग आहे. त्यामुळे मी अनेकदा सेटवर दिवाळी साजरी केली आहे. यंदाची दिवाळी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण यावर्षी मी पहिल्यांदाच झी मराठीसोबत काम करतोय. ‘धाकट्या सूनबाई’ या मालिकेचा मी भाग आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी मी झी मराठी अन् ‘धाकट्या सूनबाई’च्या संपूर्ण टीमबरोबर आणि मुख्यतः कोठारे व्हिजनच्या टीमसह साजरी करणार आहे. प्रेक्षकांनी माझ्यावर आणि माझ्या कामावर असंच प्रेम करत राहावं, हीच इच्छा आहे. माझ्याकडून सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ही दिवाळी त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो.”
