Marathi Actor Dance Video : अलीकडे सोशल मीडियावर काही जुनी गाणी नव्याने व्हायरल होण्याचा ट्रेंड सुरू आहे. यात बॉलीवूडसह काही मराठी गाणीही आहेत. विशेष म्हणजे या नव्या गाण्यांना सोशल मीडियावर खूपच लोकप्रियता मिळत आहे. इन्स्टाग्राम रिल्सवर या गाण्यांना प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो. त्यात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गाण्यांवर अनेक जण स्वतःचे व्हिडीओ शेअर करत असतात.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर असंच एक ट्रेंडिंगमधलं गाणं म्हणजे ‘नटीनं मारली मिठी’ हे गाणं. लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांनी गायलेलं हे गाणं सोशल मीडियावर बरंच ट्रेंडिंगमध्ये आहे. अनेकांनी या गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. अगदी सामान्य नेटकऱ्यांप्रमाणे मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांना या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही.

अशातच मराठी अभिनेता अजिंक्य राऊतने ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर त्याच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. शूटिंगच्या मोकळ्या वेळेत हा डान्स केला असल्याचे अजिंक्यने स्वत: म्हटलं आहे. या डान्स व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अजिंक्य म्हणतो, “तुम्ही जर माझं हे रुप पाहिलं नसेल, तर तुम्ही अजून मला ओळखलेलंच नाही”. तसंच यापुढे त्याने “जेव्हा शूटिंग नसतं आणि सुट्टीच्या दिवशी हे गाणं तुमच्यासमोर येतं” असंही म्हटलं आहे.

अजिंक्य राऊत इन्स्टाग्राम व्हिडीओ

अजिंक्यच्या या डान्स व्हिडीओला ८७ हजार हून अधिक चाहत्यांनी पाहिलं आहे. तर सहाशेहून अधिक चाहत्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांना हा डान्स आवडला असल्याचे म्हटलं आहे. “खूपच भारी”, “छान नाचतोस”, “तू असे आणखी डान्स व्हिडीओ शेअर कर”, “डान्स आणि तुझे एक्स्प्रेशन्स एकदम कमाल”, “मस्तच अजिंक्य” अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अजिंक्यच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ‘विठू माऊली’ मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाला. या मालिकेत त्यांनी विठ्ठलाची भूमिका केली होती. यानंतर तो पुन्हा छोट्या पडद्यावरील ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या मालिकेतील त्याची इंद्रा ही भूमिका चांगलीच गाजली. या मालिकेमुळे लाखो तरुणींचा क्रश झालेल्या अजिंक्यने चित्रपटांतही काम केलं आहे.

अजिंक्यने ‘टकाटक २’, ‘सरी’ असे दर्जेदार चित्रपट करून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. शेवटचा तो ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत काम करताना दिसला. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अजिंक्य सोशल मीडियाद्वारे कायमच सक्रीय असतो. त्याच्या फोटो व व्हिडीओला चाहते कायमच चांगला प्रतिसाद देत असतात. अशातच त्याचा हा नवीन डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.