Marathi Actor Omkar Karve : इंडस्ट्रीत काम करायचं, रुपेरी पडद्यावर झळकायचं याचं आकर्षण प्रत्येकाला असतं. पण, या मनोरंजनविश्वात तुम्हाला सगळ्याच माणसांचा चांगला अनुभव येईल असं नाहीये. रिप्लेसमेंट, नेपोटिझम, वाढत्या स्पर्धेमुळे कुठेही काम न मिळणं, निर्मात्याचा त्रास, वेळेत पैसे न मिळणं…अशा बऱ्याच गोष्टींचा त्रास कलाकारांना सहन करावा लागतो. अलीकडच्या काळात कलाकार गप्प राहून हा त्रास सहन करण्यापेक्षा याविषयी उघडपणे, स्पष्ट बोलू लागले आहेत. इंडस्ट्रीत प्रत्येकालाच वाईट अनुभव येत नाही पण, अशा पद्धतीने चुकीचं वागणाऱ्या लोकांना इंडस्ट्रीतून बाहेर काढलं पाहिजे, असं मत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता ओमकार कर्वेने दिलं आहे.
ओमकारने ‘आभाळमाया’, ‘अधुरी एक कहाणी’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. ‘वहिनीसाहेब’ ही मालिका खऱ्या अर्थाने ओमकार कर्वेच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरली. मात्र, २०१५ नंतर त्याला कुठेही काम मिळत नव्हतं. यानंतर वैयक्तिक आयुष्यात सुद्धा त्याने बराच संघर्ष केला. काम पुन्हा एकदा सुरू केल्यावर ओमकारला एका मालिकेच्या सेटवर भयंकर वाईट अनुभव आला होता. याबाबत त्याने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सविस्तरपणे सांगितलं आहे.
ओमकार कर्वे सांगतो, “मराठी इंडस्ट्रीमधील अनेक प्रोडक्शन हाऊसेस खूपच चांगली आहेत. पण काही प्रोडक्शन हाऊसच्या बाबतीत असं म्हणता येणार नाही. साधारण एक-दोन वर्षांपूर्वी मी त्यांच्याबरोबर काम केलं. सुरुवातीला मला असं वाटलं की, छान काम होईल…सगळ्या गोष्टी छान असतील. पण, जी वाईट परिस्थिती मी आधी पाहिली होती…त्यापेक्षाही कित्येकपटीने वाईट…म्हणजे खूपच वाईट परिस्थिती मी त्या सेटवर पाहिली. त्याच्यापेक्षा थर्ड क्लास माणूस मी पूर्ण इंडस्ट्रीमध्ये पाहिला नसेल…इतका तो थर्ड क्लास माणूस आहे. जनावराला सुद्धा तिथे चांगली किंमत होती पण, माणसाला नव्हती. हे स्टेंटमेंट मी यापूर्वी माझ्या एका फेसबूक पोस्टमध्ये केलं होतं.”
अभिनेता पुढे म्हणाला, “माझी ती पोस्ट त्यांना इतकी बोचली की चॅनेलला त्या माणसाने काय सांगितलं मला माहिती नाही. मला त्या मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आलं. माझ्याबरोबर घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगतो. बाथरूममध्ये पिवळ्या रंगाचा एक डीम लाइट होता. खरंतर, त्यातून काहीच दिसायचं नाही. म्हणून जो प्रोडक्शन मॅनेजर आहे त्याला मी सांगितलं की, मी पैसे देतो फक्त एक पांढरा उजेड पडेल असा बल्ब घेऊन ये. त्याने लगेच निर्मात्याला सांगितलं आणि त्याचा मला फोन आला, ‘अरे ओमकार काय हे…तू बल्ब वगैरे मागवलास’ म्हटलं हो! पैसे सुद्धा त्याला दिलेत. यावर तो माणूस म्हणाला, ‘बघ असं करू नकोस…मी प्रोडक्शनमध्ये काही नियम सेट केलेले आहेत. तुझ्यासारख्या सिनिअर व्यक्तीने जर असं केलं तर, मग जे आता नवीन कलाकार येतील…ते आता तुलाच फॉलो करणार.’ माझं असं झालं…मी अशी कोणती मोठी गोष्ट मागितली? पैसे सुद्धा मी दिलेत. फक्त बल्ब आणून द्यायला सांगितला…यात माझी काय मागणी होती…साधा बल्ब मागितला होता.”
“हे तर काहीच नाही…त्या प्रोडक्शनमध्ये प्रत्येकाला दोनच पोळ्या मिळायच्या. बघा आता तुम्हीच…कसे हाल केले जातात. फक्त दोन पोळ्या मिळणार, चहा फक्त दोन वेळेचा…बरं त्यात सुद्धा गंमत अशी, आपण जर चहासाठी स्वत:चा Mug दिला, तर त्या स्पॉट दादांनी मला सांगितलं. सर हा Mug नका देऊ कारण, आम्हाला सांगितलं गेलंय की, असं चालणार नाही…आर्टिस्टना लाडावून ठेवायचं नाही. हे ऐकल्यावर माझं असं झालं…यात लाडाचा काय प्रश्न? आम्ही आमचे Mug देतोय, त्यातून आम्हाला फक्त चहा द्या. यापेक्षा जास्त मी काय मागितलं? तुमचा गॅस वाचवण्यासाठी तुमचे हे नियम असतात…कमीत-कमी चहा तरी चांगला द्या.”
“टेक्निशिअन टीमचेही हाल होते. त्यांना असे छोटे स्टिलचे ग्लास दिले होते. सेटवरचा नियम काय तर… टेक्निशिअन येणार, तिथे चहा भरून ठेवलेला असेल, तिथून चहा घ्यायचा…चहा पिऊन झाला की, तो ग्लास धुवायचा आणि परत तिथेच ठेवायचा. दुसरा टेक्निशिअन येणार आणि तो परत तोच ग्लास वापरणार, तिथे दोन-तीन ग्लास ठेवलेले होते. हे का आणि कशासाठी? हे सगळं करून काय मिळणार? बरं निर्माताच क्रिएटिव्ह, निर्माताच लेखक, निर्माताच कॉस्ट्यूम डिझायनर, तोच सर्वेसर्वा, तोच संवाद लेखक…सगळं काही मी असं त्याचं होतं.”
“मी जे वाक्य बोललो ना… जनावराला सुद्धा माणसापेक्षा चांगली ट्रिटमेंट मिळते…सेटवर एक श्वान होता. श्वानाला एक वेगळी मेकअप रूम होती. त्यात एसी वगैरे होता…बाकी कलाकार सगळं एकत्र मॅनेज करायचे. तुम्ही सेटवर येऊन वाटेल तशा शिव्या घालणार, लोकांना मारणार, त्यांना हडतूड करणार आणि प्रत्येकाला म्हणणार…कुणीही माझ्या आयुष्याचं वाकडं करू शकत नाही. अरे हे सगळं कुणाच्या जीवावर बोलताय? त्यांच्या ओळखीत कुणीतरी बुआ-बाबा होता. त्याचा तू भक्त आहेस…त्या बाबाला सुद्धा आता अटक झालीये. तुम्ही प्रत्येक टेक्निशिअनची वाट लावताय, सर्वांची वाट लावताय. पण, अशा निर्मात्यांना काम देणंच चुकीचं आहे. ज्या व्यक्तीविषयी मी आज बोलतोय…ती इंडस्ट्रीला लागलेली कीड आहे. पण, त्या माणसाविषयी कुणीही बोलत नाही. कारण, प्रत्येकाच्या मनात भीती आहे की, आपण आज काही बोललो तर उद्या आपल्याला काम मिळणार नाही. पर डेवर जे कलाकार काम करतात…त्यांना खरंच भीती आहे. पण, जे अनुभवी कलाकार आहेत..त्यांनी बोललं पाहिजे. कारण, हा माणूस मारतो…नुसत्या शिव्या घालत नाही तर लाथाबुक्क्यांनी मारतो. या अशा माणसांना इंडस्ट्रीच्या बाहेर काढलं पाहिजे.” असं स्पष्ट मत ओमकारने व्यक्त केलं आहे. हे सगळं सांगताना तो प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, ओमकार कर्वे सध्या कॅटरिंग व बँक्वेट इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. मित्राबरोबर पार्टनरशिपमध्ये ओमकार हा बिझनेस करतोय. एकाच वेळी १० ते १५ हजार लोकांना आम्ही सर्व्ह करू शकतो असं त्याने सांगितलं. तसंच इंडस्ट्रीतल्या काही लोकांमुळे मी माझं फिल्ड बदललं असंही त्याने नमूद केलं.
