कलाक्षेत्र हे अनिश्चित मानलं जातं. प्रत्येकवेळी तुमच्याकडे काम असेलच असं नाही. त्यामुळे इंडस्ट्रीत काम करणारे बरेच कलाकार घरची जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडण्यासाठी आपली नोकरी सांभाळून या क्षेत्रात काम करताना दिसतात. मालिकाविश्वातील अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याची नुकतीच नोकरीतून निवृत्ती झाली आणि आता ते पूर्णवेळ अभिनयासाठी देणार आहेत.
मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांतून घराघरांत लोकप्रिय झालेले अभिनेते प्रकाश धोत्रे नुकतेच नोकरीतून निवृत्त झाले. त्यांनी आजवर ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ अशा बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. सध्या ते ‘जुळली गाठ गं’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.
अभिनेते नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्यांच्या पत्नीने प्रकाश यांच्यासाठी खास पोस्ट शेअर करत त्यांना “आता तुमचा पूर्णवेळ अभिनयासाठी द्या” असा सल्ला दिला आहे.
“आज आमचे हे ऑफिसमधून अधिकृतपणे रिटायर्ड झाले… ३९ वर्षांचा एक प्रामाणिक, जबाबदारीनं भरलेला आणि पूर्ण निष्ठेनं जगलेला प्रवास… पण आज एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली! आजपासून हे त्यांच्या पहिल्या आणि सच्च्या प्रेमाला म्हणजेच अभिनयाला पूर्ण वेळ देणार आहेत! हो, ज्यासाठी आधी वेळ काढावा लागत होता, आता ते क्षेत्र त्यांचं फुल टाइम कमिटमेंट बनणार आहे. आज मी अभिमानाने सांगते की यांनी ऑफिसमध्ये मेहनत केली, पण रंगभूमीवर तेवढाच जीव ओतून काम केलं. आता अभिनय, शूटिंग आणि नाटकात पूर्ण वेळ काम करणार…नव्या भूमिका, नव्या कथा आणि नव्या जोमात! हे रिटायरमेंटचं सेलिब्रेशन नाही. ही तर दुसऱ्या अंकाची धमाकेदार सुरुवात आहे! हॅपी रिटायरमेंट आणि Welcome to your Full-Time अभिनयाची दुनिया! आता रंगमंच तुमचा आहे. संवाद तुमचे आहेत आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत…” अशी पोस्ट प्रकाश धोत्रे यांच्या पत्नीने शेअर केली आहे.
दरम्यान, प्रकाश यांच्या पोस्टवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेची मुख्य नायिका अक्षया नाईक प्रतिक्रिया देत लिहिते, “किती छान लिहिलं आहे काकूंनी.. खूप गोड आणि आप्पा, तुम्हाला तुमच्या Second Inningsच्या खूप खूप शुभेच्छा” याशिवाय मराठी कलाविश्वातील अन्य कलाकारांकडून देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे.