‘पारू’, ‘दीप ज्योती’, ‘असे हे कन्यादान’ या मालिकांमुळे अभिनेता प्रसाद जवादे घराघरांत लोकप्रिय झाला. वैयक्तिक आयुष्यात २०२३ मध्ये प्रसादने अभिनेत्री अमृता देशमुखशी लग्न केलं. या दोघांची पहिली भेट ‘बिग बॉस मराठी’च्या घरात झाली होती. शोमध्ये यांची खूप छान मैत्री होती. यानंतर शो संपल्यावर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं अन् प्रसाद-अमृता लग्नबंधनात अडकले. नुकताच अमृताने नवऱ्याला दिलेल्या अधिकमासातील मानपानाचा खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सध्या सर्वत्र अधिक मासाचा उत्साह आहे. महाराष्ट्रातील घराघरांत जावयाचं कौडकौतुक केलं जात आहे. सर्वसामान्य लोकांप्रमाणे अनेक मराठी कलाकारांनी देखील अधिकमास साजरा केला आहे. अधिक मास हा जवळपास अडीच ते तीन वर्षांनी येतो. यादरम्यान, जावयाचं सासरी मानपान केलं जातं. प्रसाद जवादे सुद्धा यासाठी खास सासुरवाडीत गेला होता. यावेळी प्रसाद-अमृता या नवरा-बायकोने Twinning लूक केल्याचं पाहायला मिळालं.

अमृताच्या आई वैशाली देशमुख यांनी सर्वप्रथम प्रसाद-अमृताचं औक्षण केलं. यानंतर लेकीचं अन् जावयाचं मोठ्या उत्साहात त्यांनी घरी स्वागत केलं. प्रसादला अधिकमासाचं वाण देऊन सासुबाईंनी त्याला प्रेमाने गोड पदार्थ भरवले. पण, या व्हिडीओमध्ये एक खास गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे, सासुबाईंनी प्रसादला ज्याप्रकारे अधिकमासाचं वाण दिलं…तसंच प्रसादने सुद्धा त्याच्या सासुबाईंसाठी खास साडी भेट म्हणून आणली होती.

यानंतर हे कुटुंबीय एका हॉटेलमध्ये महाराष्ट्रीय थाळीचा आस्वाद घेण्यासाठी पोहोचले. यावेळी प्रसाद उखाणा घेत म्हणाला, “अधिकमास…आमरस पुरीचा बेत खास; अमृता जरा एकदा माझ्याकडे पाहून मस्त हास”

तर, अमृता उखाणा घेत म्हणते, “अधिक महिन्यात देतात अनारशाचं वाण..प्रसादचं आहे माझा जीव की प्राण!” अभिनेत्रीने या सुंदर व्हिडीओला, अनारसे, गिफ्ट्स, खास महाराष्ट्रीय थाळी आणि आमचं जरा अधिकच twinning for this अधिक मास Celebration! असं खास कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर “जावई असावा तर असा” अशा कमेंट्स करत प्रसादवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या अभिनेता झी मराठीच्या ‘दीप ज्योती’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.