Pushkar Kshotri Comment On KBC Ishit Bhatt : काही दिवसांपूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’ शोमधील एक मुलगा चांगलाच चर्चेत आला होता. इशित भट्ट असं त्या मुलाचं नाव. अपल्या बुद्धीचातुर्याने त्याने शोमध्ये सहभाग घेतला, पण बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी केलेल्या उद्धट संभाषणामुळे तो अधिक चर्चेत आला. हॉट सीटवर पोहोचताच इशित खूप उत्साही दिसला होता. पण, गेम सुरू होताच मुलाने अमिताभ बच्चन यांच्याशी उर्मटपणे बोलण्यास सुरुवात केली.

अवघ्या दहा वर्षांच्या इशितचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि अनेक जण या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये त्याच्या उद्धट वागण्यावर टीका करीत आहेत. अर्थात काही जण या ट्रोलिंगमध्ये त्याचा बचावही करत आहेत. तसंच काही जण त्याच्या वागणुकीबद्दल आई-वडिलांना दोष देत आहेत. अशातच या मुलाबद्दल अभिनेता पुष्कर क्षोत्री याने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पुष्कर म्हणतो, “लहानपणी आई-वडील सांगायचे की तो मोठा आहे, त्याच्या पाया पड, आशीर्वाद घे. पण पाया पडल्याने तुम्ही आदर देताय असं होतं का? तुमचा आदर तुमच्या वागण्या-बोलण्यातून आला पाहिजे. तुम्ही पाया पडलात आणि तो मुलगा (इशित भट्ट) जसं बोललाय, तसं बोललात तर काय उपयोग? एखादा मुलगा चुणचुणीत असणं आणि आगाऊ असणं यात फरक आहे, त्यामुळे आपला मुलगा चुणचुणीत, त्याच्याकडे कलागुण आहेत की तो आगाऊ आहे, हे आई-वडिलांनी ओळखणं गरजेचं आहे आणि आगाऊपणा असल्यास तो नष्ट करणं हे त्यांचं काम आहे.”

KBC मधील इशित भट्टचा व्हायरल व्हिडीओ

यानंतर पुष्कर म्हणाला,”आपला मुलगा घरी आलेल्या पाहुण्यांशी कसा बोलतो? मित्र-मैत्रिणींशी कसा बोलतो? शाळेत कसा वागतो? त्या त्या वयात आई-वडिलांनी आपल्या मुलाचं वागणं ओळखणं गरजेचं आहे. त्याच्या चुकांवर पांघरूण घालणं टाळलं पाहिजे आणि त्याला त्याबद्दल शिक्षा किंवा समजूत देणं तरी गरजेचं आहे.”

आरपारला दिलेल्या मुलाखतीत पुष्कर पुढे इशितबद्दल असं म्हणला, “तो मुलगा आज सोशल मीडियावर इतका ट्रोल होत आहे, त्याच्यावर इतकी टीका केली जात आहे आणि याचं कारण म्हणजे त्याचे आई-वडील. आई-वडिलांच्या मनात हे विचार येत असतील की, कुठे त्याला त्या शोमध्ये पाठवलं. आमच्याकडेही असे अनेक पालक येतात, जे आमचा मुलगा चांगला जोक सांगतो, तो पुढे जाऊन अभिनेता बनेल असं म्हणतात. पण, मग आम्ही त्यांना सांगतो की चांगला जोक सांगून अभिनेता होता येतं का? अभिनेता होण्यासाठी वाचन, निरीक्षणासह अनेक गोष्टी असतात हे पालकांना कळलं पाहिजे.”