‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरली होती. २०१३ ते २०१६ अशी जवळपास तीन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या मालिकेतील सगळेच कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले होते आणि प्रेक्षकांनी या सगळ्या कलाकारांना मनापासून आपलंसं केलं. यामध्ये जान्हवीच्या सख्ख्या भावाची म्हणजेच पिंट्याची भूमिका अभिनेता रोहन गुजरने साकारली होती. रोहनने पिंट्याची भूमिका इतकी छान साकारली होती की, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात पिंट्यासारखा भाऊ असावा असं वाटू लागलं होतं.
रोहनने यानंतर ‘बन पाव’, ‘लव्ह लग्न लोचा’, ‘नवी जन्मेन मी…’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्यात नोव्हेंबर २०१७ मध्ये स्नेहल देशमुखबरोबर लग्नगाठ बांधली. हे दोघंही अनेक वर्षे एकमेकांना ओळखत होते. रोहन आणि स्नेहल दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.
नुकतीच या जोडप्याने त्यांच्या आयुष्यातील एक आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. रोहन आणि स्नेहल लवकरच आई-बाबा होणार आहेत. डोहाळेजेवणाचा सुंदर व्हिडीओ शेअर करत या जोडप्याने ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे.
“New Chapter प्रेमाच्या माणसांसोबत रंगलेला हा प्रेमळ सोहळा!” असं कॅप्शन रोहनने या व्हिडीओला दिलं आहे. जवळचे कुटुंबीय अन् नातेवाईंकाच्या उपस्थितीत स्नेहलच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला.
डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमात रोहन आणि स्नेहल या दोघांनीही Twinning लूक केल्याचं पाहायला मिळालं. रोहनने शेअर केलेल्या व्हिडीओवर मराठी कलाकारांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. पूर्वा कौशिक, अमृता पवार, मयुरी देशमुख, संग्राम समेळ, साक्षी गांधी, योगिता चव्हाण अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत रोहन आणि स्नेहल या दोघांनाही भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, रोहन गुजरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या तो ‘सन मराठी’च्या ‘तू अनोळखी तरी सोबती’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. याशिवाय तो ‘आमने सामने’ नाटकात सुद्धा काम करतोय. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने तो ‘तुम बिन जाऊँ कहाँ’ या शॉर्टफिल्ममध्ये झळकणार असल्याची घोषणा केली होती.

