‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या रोहित परशुरामचं झी मराठीवर पुन्हा एकदा कमबॅक होत आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेत तो ‘शंकर’ हे दमदार, डॅशिंग पात्र साकारणार आहे. नुकताच त्याच्या एन्ट्रीचा प्रोमो प्रेक्षकांसमोर आला. आपल्या लाडक्या अर्जुनला पुन्हा एकदा नव्या रुपात पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
रोहित त्याच्या ऑडिशनचा किस्सा सांगत म्हणतो, “कमळीच्या सेटवर मी आदित्यला म्हणजेच बंड्याला, सहज भेटायला गेलो होतो. त्यावेळी अनिकेत साने नावाचे दिग्दर्शक झी मराठीवर नवीन मालिका घेऊन येत आहेत असं समजलं… आणि त्यांच्या नवीन मालिकेच्या ऑडिशन्स सुरू होत्या.मी लगेच सरांना भेटलो, ऑडिशन दिली. त्यानंतर अनेक ऑडिशनचे अनेक राऊंड झाले, सीन वर्क झाले आणि अखेर झी मराठीने मला पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाचा भाग बनवलं. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. मी कोल्हापुरी भाषा आणि त्याचा लहेजा शिकण्याचा प्रयत्न करतोय. या जोडीला भरपूर व्यायाम, योग्य आहार आणि नियमित दिनचर्या पाळतोय.”
रोहित पुढे म्हणाला, “निवेदिता सराफ ताईंच्या प्रोजेक्टमध्ये आपण फक्त हातात भाला घेऊन जरी उभे असलो, तरीही मला सार्थक झाल्यासारखं वाटलं असतं. इथे तर मी मुख्य नायकाची भूमिका करतोय, त्यामुळे मी खूपच भावनिक झालोय. त्यांच्यासोबत सेटवर वावरताना मला माझा संपूर्ण प्रवास आठवतो आणि खरंच मेहनतीला देव फळ देतो यावर पुन्हा एकदा विश्वास बसतो. स्मिता सरवदे ताई, संजय दादा आणि इतर सर्व कलाकार अतिशय अनुभवी, उत्तम अभिनेते आणि तितकेच सहकार्य करणारे आहेत. त्यामुळे एका यशस्वी मालिकेचा भक्कम पाया इथे रचला जातोय, याची जाणीव सतत होत राहते. ज्या दिवशी मला समजलं की निवेदिता सराफ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत, त्या दिवशी मी अक्षरशः मारुतीरायाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली की मला ही मालिका मिळूदेत. त्यांचा अनुभव, त्यांच्या अभिनयातील सहजपणा, गोडवा आणि त्यांचं मनमोहक हास्य याने गेली चाळीस वर्षे महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. अशा दिग्गज अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्याबरोबरचा प्रत्येक सीन माझ्यासाठी एक शिकण्याचा अनुभव असणार आहे.”
“प्रेक्षकांनी अर्जुनला तीन वर्ष अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि भरभरून प्रेम दिलं. आता शंकरलाही ते तितकंच प्रेम देतील, याची मला पूर्ण खात्री आहे. साताऱ्याच्या मातीतला अर्जुन आणि कोल्हापूरच्या लाल मातीतला शंकर हे मला जणू भावंडांसारखे वाटतात. त्यामुळे ही दोन्ही पात्रं माझ्या खूप जवळची आहेत. अर्जुननंतर आता शंकरच्या रूपात मी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय. त्यांनी जसं आतापर्यंत माझ्यावर प्रेम केलं, तसंच प्रेम आणि आशीर्वाद शंकरलाही देतील, अशी अपेक्षा आहे. मला खात्री आहे की शंकरचा प्रवास, त्याचा स्वभाव प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भावेल.” अशा भावना रोहित परशुरामने व्यक्त केल्या.
