Actor Rugved Phadke Wedding Photo : मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी यंदाच्या वर्षी लग्नगाठ बांधत आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केली. मालिकाविश्वातील असाच एक लोकप्रिय अभिनेता नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या विवाहसोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या अभिनेत्याचं नाव आहे ऋग्वेद फडके.

ऋग्वेदच्या पत्नीचं नाव आहे विभा. या जोडप्याचा साखरपुडा गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात पार पडला होता. आता वर्षभराने हे दोघंही लग्नबंधनात अडकले आहेत. यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेली अनेक वर्षे हे दोघंही एकमेकांना डेट करत होते.

ऋग्वेद आणि विभा यांचा लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला. अभिनेत्याने लग्नात पेशवाई लूक केला होता. तर, त्याच्या पत्नीने निळ्या रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसल्याचं पाहायला मिळालं. या दोघांच्या लग्नाला अनेक मराठी कलाकार देखील उपस्थित होते.

ऋग्वेदच्या पत्नीने काही वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक छानशी पोस्ट लिहिली होती. “१७ सप्टेंबर २०२० पासून आपण एकत्र पाहिलेली कित्येक स्वप्नं आणि या काही वर्षात ती पूर्ण होण्याचा प्रवास… Rather एकत्र हट्टाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याचा प्रवास…अशी अजून खूप स्वप्नं एकत्र पाहायची आहेत.” यावरून हे दोघंही अनेक वर्षांपासून एकत्र असल्याचं स्पष्ट होतं.

दरम्यान, ऋग्वेद फडकेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या लोकप्रिय मालिकेत त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेत त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव विनोद असं होतं. याशिवाय तो ‘पारू’ मालिकेत सुद्धा झळकला होता. या दोन्ही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. याशिवाय ऋग्वेदने दिग्दर्शित केलेल्या ‘मुशाफिरी’ या नाटकाला सुद्धा प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या नाटकात अभिनेता पु. ल. देशपांडेंची व्यक्तिरेखा साकारत आहे.

याशिवाय ऋग्वेदने काही दिवसांपूर्वी लोणावळ्यात होमस्टे सुद्धा सुरू केला आहे. मळवली येथे उभारलेल्या त्याच्या व्हिलाचं नाव ‘पारिजात’ आहे. सध्या लग्नबंधनात अडकल्यावर संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वातून ऋग्वेदवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.