Sangram Samel: संग्राम समेळ हा त्याच्या विविध भूमिकांसाठी ओळखला जातो. पुढचं पाऊस, मुलगी पसंत आहे, बापमाणूस, सुखाच्या सरींनी हे मन बावरे, ललित २०५ स्वराज्य सौदामिनी ताराराणी, योगेश्वर जय शंकर, स्वीटी सातारकर, विकी वेलिंगकर अशा मालिका आणि सिनेमांतून संग्रामने वेळोवेळी त्याच्या भूमिकांची छाप पाडली आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

आता मात्र संग्राम त्याच्या कोणत्या भूमिकेमुळे नाही, तर त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने नुकतीच कलाकार या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिलीय. या मुलाखतीत त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल सांगितले. करिअरमधील काही अनुभव सांगितले. तसेच, त्याचा साखरपुडा मोडला होता, याबद्दलही खुलासा केला.

“२०१४ ची गोष्ट…”

मुलाखतीत त्याला विचारलं की, असं कधी घडलाय का, की तुझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडतंय आणि तरीही तू हसून लोकांना भेटतोयस? त्यावर संग्राम म्हणाला, “मला वाटतं की, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात किमान एकदा तरी अशी वेळ येतच असेल. “

पुढे तो असे म्हणाला, “मला एक किस्सा कायम लक्षात राहील. २०१४ ची गोष्ट आहे. तेव्हा माझी पुढचं पाऊल ही मालिका सुरू होती. हर्षदाताई, मृणालताई यांनी मला शिकवलं की, जे आपलं युनिट असतं, ती आपली फॅमिली असते. त्या मालिकेच्या वेळी त्यांनीच मला जपलं. २०१४ ला माझा साखरपुडा मोडला होता. माझं १५ वर्ष रिलेशनशिप होतं. फोनवर ते नातं मोडलं. मुलगी व तिच्या घरचे घरी येणार होते. सगळी देणी-घेणी परत करायचं होतं. माझं त्या दिवशी शूटिंग होतं; पण मी सुट्टी घेतली नाही. कारण- मी विचार केला की, संपलंच आहे, तर घरी बसून काय करू? त्याच दिवशी डान्स सीक्वेन्स होता. त्यावेळी मला डान्स येत नाही, असं वाटायचं. तर मला दोन्हीकडचं टेन्शन होतं; पण मालिकेतील कलाकार मला प्रोत्साहन देत होते. ते कुटुंब माझ्यासाठी होतं. अभिजीत केळकर वगैरे दंगा करीत होते. मला आत्मविश्वास यावा यासाठी ते सर्व काही करीत होते. अशा प्रकारे तो दिवस पार पडला. त्यामुळे तो किस्सा मी कधीच विसरणार नाही.

दरम्यान, संग्राम समेळने २०२१ मध्ये कोरिओग्राफर श्रद्धा फाटकसह लग्नगाठ बांधली आहे.