Sankarshan Karhade Children : मराठी नाटक, मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका अभिनेता म्हणजेच संकर्षण कऱ्हाडे. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही वर्षांत अभिनयाच्या जोडीला संकर्षणने आपल्या कवितांनी आणि निवेदक म्हणूनही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. संकर्षण वैयक्तिक आयुष्यात जुळ्या मुलांचा बाबा आहे. त्याची मुलं नुकतीच पाच वर्षांची झाली. या दोघांसाठी संकर्षणने खास पोस्ट शेअर केली आहे.
शूटिंग, नाटकांचे दौरे यामुळे संकर्षणचं शेड्युल व्यग्र असतं. पण, या सगळ्यातून वेळ मिळाला की अभिनेता आपला फॅमिली टाइम एन्जॉय करतो. संकर्षण नुकताच आपल्या दोन्ही मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी गेला होता. आई आणायला गेली की पाच मिनिटांत घरी येतात पण, मी घ्यायला गेल्यावर बसमधून उतल्यापासून घरी येईपर्यंत पाऊण तास गेला अशी गमतीशीर पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे.
संकर्षण आणि त्याच्या पत्नीचं नाव S अक्षराने सुरू होतं. त्यामुळे मुलांची नावंही त्यांनी ‘सर्वज्ञ, स्रग्वी’ अशी ठेवली आहेत.
संकर्षण लिहितो, “पोरांचं दप्तर, रेनकोट, छत्री…सगळ्यात हलकं ओझं…स्कूल बसमधून उतरताना बाबा दिसले की, त्यांना अतिआनंद होतो…चेव येतो चेव! आई घ्यायला गेली की पाच मिनिटांत घरात येतात आणि आज मी घ्यायला गेल्यावर बसमधून उतरल्यापासून घरात येईपर्यंत पाऊण तास गेला” यापुढे अभिनेत्याने हसायचे इमोजी जोडले आहेत. या पोस्टवर नेटकऱ्यांनी सुद्धा कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
“या क्षणाचा आनंद घ्या सर”, “मुलं गोड आहेत”, “रम्य ते बालपण”, “आई रोजच जाते…बाबा कधीतरी असतो…डाळ कोणाकडे शिजते हे त्यांना माहितीये”, “दोन्ही मुलं गोड आहे तुमच्यासारखीच आहेत दिसायला”, “मला माझं बालपण आठवलं”, “पोरांनी गोड पोझ दिलीये फोटोमध्ये” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.

मुलं पाच वर्षांची झाल्यावर सुद्धा संकर्षणने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. “माझ्या बाळांना आज ५ वर्षं पूर्ण झाली… घुटी, दुपटं, रांगतायेत पासून सुरू झालं ते आता सिनियर केजी, स्कूल बस, बड्डे गिफ्टपर्यंत आलंय सगळं…मोठी होताहेत पटापटा… पाहिजे ते घरच्यांकडून मिळवायची कला अवगत झालीये…शाळेच्याच वेळेला पोट दुखायची आयडीया मिळालीये..कामाचा फोन आला की रडायची खोडी अंगात आलीए…आणि बाबा घरी कधी येणार असंही विचारू लागलीयेत…वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद सर्वज्ञ, स्रग्वी!” अशी पोस्ट संकर्षणने मुलांच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त २७ जूनला शेअर केली होती.
