मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. प्राजक्ता गायकवाड, सोहम बांदेकर, स्वानंद केतकर यांच्यापाठोपाठ आता मालिकाविश्वातील आणखी एक अभिनेता लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत या अभिनेत्याने प्रेमाची कबुली दिली आहे. तसेच हटके स्टाइलने अभिनेत्याने त्याची ‘वेडिंग डेट’ सर्वांसमोर रिव्हिल केली आहे.
‘मुलगी झाली हो’, ‘फ्रेशर्स’, ‘जाऊबाई जोरात’, ‘हृदयी प्रीत जागते’, ‘मुरांबा’ अशा गाजलेल्या मालिकांमुळे अभिनेता सिद्धार्थ खिरीड घराघरांत लोकप्रिय झाला. साधारण वर्षभरापूर्वी ‘Single अध्याय संपला’ असं म्हणत सिद्धार्थने आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. यानंतर त्याने गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज सुद्धा केलं होतं. त्याची होणारी पत्नी नेमकी कोण आहे पाहुयात…
कोण आहे सिद्धार्थ खिरीडची होणारी पत्नी?
सिद्धार्थ खिरीड सौंदर्यवती डॉ. मैथिली भोसेकरच्या प्रेमात आहे.गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना ओळखतात. मैथिलीने परदेशात पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत ‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२०२३’ हा खिताब पटकावला होता. पॅरिस फॅशन वीकमध्ये सुद्धा मैथिली झळकली आहे. तिची पॅरिस फॅशन वीकसाठी सिग्नेचर मॉडेल म्हणून निवड झाली होती.
आता सिद्धार्थ आणि मैथिली लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावर ‘लॉन्चिंग Soon’ असं म्हणत अभिनेत्याने काही फोटो शेअर केले आहेत. याच फोटोंमध्ये सिद्धार्थ-मैथिलीच्या लग्नाची तारीख दडलेली आहे. पहिल्या फोटोत मैथिली वृत्तपत्र वाचताना दिसेतय. यात त्यांच्या लग्नाची तारीख २३ जानेवारी २०२६ आहे असं नमूद केलं आहे.
सिद्धार्थ खिरीडने लग्नाची आनंदाची बातमी शेअर करताच मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या दोघांनी प्री-वेडिंग शूटसाठी खास वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, सिद्धार्थ खिरीडने गेल्यावर्षी मैथिलीला गोव्यात लग्नाची मागणी घातली होती. यासाठी त्याने जय्यत तयारी केली होती. याचा व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल झाला होता. मैथिलीला सरप्राइज देण्यासाठी त्याने सुंदर प्लॅनिंग केलं होतं. यावेळी त्याने बॉलीवूड गाण्यांवर डान्स करत, आपल्या गर्लफ्रेंडला गोड सरप्राइज दिलं आणि त्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.
