Marathi Actor Sushil Inamdar visited Nana Patekar Family: नाना पाटेकरांच्या निधनानंतर ‘गोठ’ फेम मराठी अभिनेता सुशील इनामदारने डोणजे येथील ‘नानाची वाडी’ या त्यांच्या घरी भेट दिली. त्यांनी नीलकांती पाटेकर व मल्हार पाटेकर यांचं सांत्वन केलं. त्या वास्तूत नानांचं अस्तित्व अजूनही जाणवतं, अशी भावुक पोस्ट त्याने केली आहे.
सुशील इनामदारची पोस्ट
आज नानांच्या घरी गेलो… म्हणजेच नानाच्या वाडीत! नीलकांतीताई आणि मल्हार यांची भेट झाली. पण खरं सांगायचं तर, वाड्याच्या मुख्य दरवाजातून आत पाऊल ठेवल्याक्षणी सर्वप्रथम जाणवलं ते नानांचं अस्तित्व! ती वास्तू इतकी भारदस्त, इतकी जिवंत वाटली, की तिथल्या प्रत्येक कोपऱ्यात नानांच्या व्यक्तिमत्त्वाची जाणीव होत होती. असं क्षणभरही वाटलं नाही की नाना आपल्यात नाहीत. खरंच, हे सगळं शब्दांत मांडणं कठीण आहे.
नीलकांतीताईंना भेटल्यावर सुरुवातीला काय बोलावं, कसं बोलावं, त्यांचं सांत्वन कसं करावं, हेच कळत नव्हतं. कारण नीलकांतीताई स्वतः अनुभवांनी समृद्ध झालेल्या, कणखर व्यक्तिमत्त्वाच्या स्त्री आहेत. अशा व्यक्तीला आपण काय सांत्वन करणार? पण त्यांच्या अनुभवाची, समजूतदारपणाची पुन्हा एकदा जाणीव झाली. आम्ही त्यांना भेटायला गेलेली पाच माणसं निलू ताई यांच्याबरोबर स्टारप्रवाह वरील “गोठ” या मालिकेत आम्ही एकत्र काम केले होते (नमिता नाडकर्णी वर्तक, रवी करमरकर, विघ्नेश कांबळे, रोहन सामंत आणि मी) सगळ्यांच्याच मनात खूप काही होतं, पण बोलण्यासाठी शब्दच फुटत नव्हते. आमची ती अवस्था त्यांच्या लक्षात आली असावी. त्यांनीच दुसरा विषय काढला, आम्हाला बोलतं केलं. मग एकत्र काम केलेल्या गोठच्या दिवसांच्या आठवणी निघाल्या. जुन्या गोष्टी आठवल्या आणि खूप दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावरचं, गालातल्या गालात हसणारं ते हास्य पाहायला मिळालं. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे नाना आता सोबत नाहीत, या सत्याची जाणीव आणि त्यांचं दुःखही सतत जाणवत होतं.
नीलकांतीताई आणि मल्हार या दोघांचं दुःख जणू आपल्याच घरातलं आहे, असं वाटत होतं. त्यांचं दुःख आपण दूर करू शकत नाही, पण त्याची जाणीव मात्र मनाला सतत होत होती. छान गप्पा झाल्या. निघताना नीलकांतीताईंना घट्ट मिठी मारली. आणि त्या स्वतःहून म्हणाल्या…“तुम्ही काळजी घ्या रे!” किती साधे शब्द… पण त्या शब्दांमागची भावना किती मोठी! आयुष्य आणि मृत्यू यांच्यामध्ये खरंच कितीसं अंतर असतं? कदाचित दोन मिनिटांचं, दोन क्षणांचं, दोन श्वासांचं….
तिथून निघाल्यानंतर आम्ही मुंबईच्या दिशेने परतलो. पण खरंच, नाना त्या वास्तूतून निघून गेलेत, असं अजिबात वाटत नाही. उलट, मला असं वाटतं की त्या वाड्यात नानांचं अस्तित्व कायम राहणार आहे.
तिथली असंख्य झाडं… त्यातली त्यांनी स्वतःच्या हातांनी लावलेली काही झाडं… वाड्याच्या बाजूला असलेली ती प्रशस्त, सुंदर विहीर… तिच्या खोलीसारखंच नानांचं मनही किती खोल आणि विशाल असावं, याची जाणीव करून देणारी ती वास्तू! त्या परिसरात पसरलेला निसर्ग पाहताना जाणवत होतं की नानांनी केवळ स्वतःसाठी काही उभं केलं नाही, तर शेतकऱ्यांसाठी आणि तिथल्या माणसांसाठीही खूप काही केलं आहे.
कधी कधी एखाद्या माणसाचं मोठेपण समजून घ्यायला त्याच्याबद्दल फार काही ऐकण्याची गरज नसते. त्याने मागे ठेवलेल्या गोष्टी, त्याने जपलेली माणसं आणि त्याच्या कामातून उमटलेला ठसा बरंच काही सांगून जातो.
नानांची वाडी पाहताना हे सगळं मनापासून जाणवलं.
काही माणसं शरीराने आपल्यातून निघून जातात; पण त्यांनी निर्माण केलेलं अस्तित्व, त्यांनी जपलेली माणसं आणि त्यांनी केलेलं काम त्यांना कायम जिवंत ठेवतं. नानांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! अशी पोस्ट सुशील इनामदारने केली आहे.
दरम्यान, नाना पाटेकर यांचं ८ ऑक्टोबर रोजी गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यांच्यावर डोणजे येथील फार्महाऊसमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
