मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध अभिनेते म्हणून स्वप्नील राजशेखर यांना ओळखलं जातं. आता लवकरच ते ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. स्वप्नील राजशेखर हे मराठी सिनेइंडस्ट्रीतले दिवंगत अभिनेते राजशेखर यांचे चिरंजीव आहेत.
दिवंगत अभिनेते राजशेखर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. हे ज्येष्ठ अभिनेते रुपेरी पडद्यामागेही नेहमीच सामाजिक बांधिलकी जपताना दिसले. आज त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचे चिरंजीव स्वप्नील राजशेखर पुढे चालवत आहेत. राजशेखर यांचं २५ डिसेंबर २००५ रोजी निधन झालं. आज त्यांना जाऊन २० वर्षे झाली आहेत. वडिलांच्या आठवणीत भावुक होत स्वप्नील यांनी पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
स्वप्नील राजशेखर यांची भावुक पोस्ट
२५ डिसेंबर २००५ ची सकाळ!!
आदल्या रात्री पप्पांना भेटून येऊन झोपलो होतो…
२४ डिसेंबरला आदल्या रात्रीची आमची भेट…“पप्पा, तुमचं शूटिंग लागलंय दोन आठवड्यांनी… तुम्हाला हॉर्स रायडिंग करायचंय. साहेब करतील ना? प्रोड्युसर विचारतायत… काय सांगू त्याना ?”काही क्षण माझ्याकडे पाहत राहिले पप्पा…. मग म्हणाले “करतोय म्हणून सांग”
आधीच्या हॉस्पिटलायजेशनमुळे पप्पा अशक्त झाले होते. झपाट्याने उभारी धरण्याची गरज होती. त्यासाठी त्यांच्यासारख्या जन्मजात नटाला जो ट्रीगर हवा तो मी दिला, त्यांचं एक शूटिंग लागणार होतं… त्याची आठवण करुन दिली. मग डोळे चमकले त्यांचे…“करुया” म्हणाले.
त्यावेळी मागे रेडिओ सुरु होता. आणि “त्यावर मालवून टाक दीप” सुरु झालं.. पप्पांचं आणि माझं अत्यंतिक आवडतं.. पप्पा डोळे मिटून शांतपणे ते गाणं आत मुरवू लागले… त्यातल्या जागांना “आहा” अशी त्यांची दाद जात होती… माझ्याकडे बघत नेहमीचं “काय (लता) बाई आहे” असं दोन्ही हात वर करत न बोलता सांगत होते…मी सहमती देत कौतुकाने त्यांच्या कपाळावरची ती तुरळक झालेली बट सरळ करत होतो….
त्या गाण्यातल्या आर्त स्वरांमुळे आणि एकूणात पप्पांच्या प्रकृतीच्या काळजीने आलेली अस्वस्थता… यामुळे एक प्रचंड उदास दडपण होतं…ऐन डिसेंबरमध्ये आभाळ भरुन आलं होतं… पाऊस नव्हता पण वातावरण धुम्मस होतं… गदगद होतं.. हुरहुर होती… त्यावेळी मन अशुभाचे संकेत नाकारत होतं…. पण आज विचार करताना जाणवतं की आम्हा फिल्मी बापलेकाच्या शेवटच्या भेटीची ती यथायोग्य फिल्मी पार्श्वभूमी तयार झाली होती…. आमची अखेरची भेट अशीच असणार होती….
माझा पाय निघत नव्हता… मी पप्पांच्या भोवती उगाचच रेंगाळत होतो…. पप्पा शेवटी म्हणाले…”जा तू… दिवसभर कंटाळला असशील.. पोरं पण पेंगुळलीयत… सकाळी लवकर ये… जा”
मी परत पप्पांच्या डोक्यावरुन गालावरुन मायेने हात फिरवला… त्यांचा उबदार हात हातात घेऊन खूप वेळ थोपटला…. मुलांनी त्यांना पप्पी दिली….. दाराबाहेर पडेपर्यंत मी त्यांच्याकडे पाहत होतो. त्या रात्री कशी कुणास ठाऊक खूप दिवसांनी अतिशय गाढ झोप लागली…. सकाळी उशीरपर्यंत जाग आली नव्हती. डोळे उघडले ते फोनच्या रिंगने…
“बाबा… लौकर या…. पप्पा घाबरे झालेयत” पलीकडून आवाज आला…. मला जाणवलं… त्याक्षणी माझ्यासाठी जग बदललं…
आणि मी सुध्दा….‘I was never the same man again’
कणेकरांच्या लेखात वाचलं होतं… गेली २० वर्षे तिच अनुभूती आहे…वीस वर्ष!!!
दरम्यान, स्वप्नील राजशेखर यांनी वडिलांसाठी शेअर केलेल्या या भावनिक पोस्टवर नेटकऱ्यांनी भावुक कमेंट्स करत त्यांना आदरांजली वाहिली आहे.
