Star Pravah Anandi New Serial : स्टार प्रवाह वाहिनीवर गेल्या काही महिन्यांत अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यापैकीच एक मालिका म्हणजे ‘आनंदी’. लोकप्रिय अभिनेत्री जाई खांडेकर आणि अभिनेते समीर धर्माधिकारी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. या मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता विकास पाटील झळकत आहे. आजवर असंख्य मालिका, चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमांतून विकासने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलेलं आहे. मध्यंतरी काही दिवस विकासने मालिकाविश्वातून ब्रेक घेतला होता.

आता जवळपास ३ वर्षांनंतर विकासने स्टार प्रवाहच्या ‘आनंदी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका साकारणार आहे. विद्याधर निंबाळकर असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. विद्याधर हा युगंधरचा लहान भाऊ. युगंधरने स्वतः शाळेत न जाता मोलमजुरी करून विद्याधरला शिकवलं. पण विद्याधरने भावाच्या कष्टांची माती केली.

युगंधरने कष्टाने कमावलेल्या संपत्तीवर त्याची नजर आहे. अतिशय उर्मट, असंवेदनशील, अय्याशी स्वभावाच्या असलेल्या विद्याधरला पैशांचा प्रचंड माज आहे. बाई आणि बाटलीच्या नादापायी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. अशा पद्धतीचं पात्र विकासने आजवर साकारलेलं नाही. त्यामुळे विद्याधर साकारणं विकाससाठी नवं आव्हान होतं.

या भूमिकेविषयी सांगताना विकास म्हणाला, “आजवर मी सकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. पण ‘आनंदी’मधला विद्याधर पूर्णपणे वेगळा आहे. त्याची मानसिकता, त्याचा राग, त्याचा अहंकार सगळंच टोकाचं आहे. मी या मालिकेत विद्याधर पात्राच्या नकारात्मकतेला वास्तववादी पद्धतीने साकारण्याचा प्रयत्न करतोय. यामुळे एक अभिनेता म्हणून स्वतःला नव्याने शोधण्याची संधी मिळत आहे.” लवकरच मालिकेत आनंदी विवाहबंधनात अडकणार आहे. आनंदीचं लग्न होऊ नये म्हणून विद्याधर नेमकी कोणती खेळी खेळणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

vikas
Star Pravah Serial : अभिनेता विकास पाटीलची आनंदी मालिकेत एन्ट्री

दरम्यान, ‘आनंदी’ मालिका स्टार प्रवाहवर दररोज रात्री ९:३० वाजता प्रसारित केली जाते.