मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत रेवती लेले, विशाल निकम-अक्षया हिंदळकर असे बरेच मराठी कलाकार लग्नबंधनात अडकले. आता यांच्या पाठोपाठ आणखी काही कलाकारांच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. मराठी मनोरंजन विश्वातील दोन लोकप्रिय जोड्या लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. यांच्याबद्दल जाणून घेऊयात…

या दोन्ही कलाकार जोडप्यांच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. या कलाकारांची नावं आहे रुमानी खरे-स्तवन शिंदे आणि अपूर्वा गोरे-अंशुमन जोशी.

रुमानी खरे-स्तवन शिंदे अडकणार लग्नबंधनात

सिनेविश्वातील प्रसिद्ध कवी व गीतकार संदीप खरे यांची लेक अभिनेत्री रुमानी खरेचा साखरपुडा डिसेंबर २०२५ मध्ये थाटामाटात पार पडला. रुमानीने ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. रुमानीचा होणारा नवरा स्तवन शिंदे सुद्धा लोकप्रिय अभिनेता आहे. ‘स्टार प्रवाह’च्या ‘तुमचं आमचं सेम असतं’ या मालिकेत तो झळकला होता. याशिवाय स्तवनने ‘पार्टी’, ‘क्लास ऑफ 83’ या सिनेमांमध्ये काम केलेलं आहे.

रुमानी-स्तवन यांच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीने ग्रहमख सोहळ्याची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. याशिवाय रुमानीच्या हातावर स्तवनच्या नावाची मेहंदी सुद्धा रंगली आहे.

तर, दुसरीकडे स्तवनच्या लग्नाला लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत पोहोचली आहे. “आमच्या स्तवनचं लग्न” असं म्हणत तिने लग्नघरातून खास फोटो शेअर केले आहेत.

roomani khare stavan shinde
रुमानी खरे व स्तवन शिंदे यांच्या लग्नाआधीच्या विधींनी सुरुवात

अपूर्वा गोरे-अंशुमन जोशी यांचं लग्न

‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा गोरे घराघरांत लोकप्रिय झाली. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिल्याचं पाहायला मिळालं होतं. अपूर्वा गोरे लवकरच लोकप्रिय अभिनेता अंशुमन जोशीबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.

अंशुमनने २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शाळा’ या गाजलेल्या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. अंशुमन अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, चित्रलेखक आणि छायाचित्रकार म्हणून ओळखला जातो.

ग्रहमख सोहळ्याचे फोटो शेअर करत अपूर्वा लिहिते, “ग्रहमख विधीसाठी काय नेसावं हा पेच कधी नव्हताच… आईच्या लग्नातला ४० वर्षे जुना शालू नेसायचा हे मी ठरवलं होतं… आणि तो नेसल्यावर आईलाही भरुन आलं. ती खुश होती आणि तिला माझं कौतुकही वाटत होतं हे मला दिसत होतं तिच्या डोळ्यात….हे प्रेम, हा गोडवा आणि हे हळवे क्षण माझ्यासोबत मी कायम जपून ठेवणार आहे हे नक्की”

दरम्यान, आता रुमानी-स्तवन आणि अपूर्वा-अंशुमन यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यासह अनेक मराठी कलाकार या जोडप्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.