Aarti Solanki on Vidyanand Bapat Attack: पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या डीजे आणि लाऊडस्पीकरच्या तीव्र आवाजाविरोधात विद्यानंद बापट हे अनेक दिवसांपासून सातत्याने आवाज उठवत आहेत. याच भूमिकेतून गुरुवारी, ३ ऑगस्ट रोजी पुण्यातील टिळक रोड परिसरात त्यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून मराठी मनोरंजन विश्वातूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

विद्यानंद बापट यांच्या डीजे आणि लाऊडस्पीकरवरील बंदीच्या मागणीला पुणेकरांचाही पाठिंबा मिळतोय. या मागण्यांबरोबरच विद्यानंद बापट यांच्या मराठीचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे इतकी शुद्ध मराठी बोलू नका अशी विनंती अभिनेत्रीने त्यांना केली आहे.

विद्यानंद बापट आपला मुद्दा अगदी स्पष्ट व थेट अस्खलित मराठीत मांडत आहेत. त्यामुळे त्यांच्या मागण्यांबरोबरच मराठी भाषेनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण हीच मराठी बिनडोक, माजोरड्या व अशिक्षित लोकांना कळत नाही, त्यामुळे तुम्ही फार स्पष्ट मराठी बोलू नका, असं मराठी अभिनेत्री आरती सोलंकीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

अभिनेत्री आरती सोलंकीने विद्यानंद बापट यांना केली विनंती

“विद्यानंद बापट यांना कळकळीची विनंती आहे, फार स्पष्ट मराठी बोलू नका. काय आहे की डीजे आणि ध्वनीप्रदुषण याविरोधात तुम्ही बोलत आहात, पण समोरच्या असुशिक्षित, माजोरड्या, बिनडोक, दीड शहाण्या लोकांना वाटतंय की तुम्ही गणपती बाप्पा आणि गणेशोत्सवाबद्दल बोलत आहात. तुमच्यावर ज्याने हल्ला केला, त्यावरून त्याचे शिक्षण आणि त्याच्यावर झालेले संस्कार दिसून येतात,” असं आरती सोलंकीने पोस्टमध्ये लिहिलंय.

आरती सोलंकीच्या पोस्टवरील कमेंट्स

दरम्यान, आरतीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘मुळात मंडळे सुसंस्कृत नाहीत. त्यांना देव आणि धर्म ह्यापेक्षा थिल्लर नाच गाणी हवी आहेत. डीजे आणि धर्म ह्यांचा कसलाच संबंध नाही. ज्याला देव आणि धर्म कळतो तो अतिशय योग्य पद्धतीने सण साजरा करतो. डीजे संस्कृती ही विकृतांची आहे. देव आणि धर्माशी ह्यांचा संबंध नाही. गणेश मिरवणुकीत लकडी पुलावर २०१५ मध्ये ह्याचं गाणं वाजतं जुम्मे की रात है चुम्मे की बात हैं,’ अशी कमेंट एका युजरने केली. तर, ‘जाहीर निषेध. मारहाण करून विषय संपत नसतो. बापट असो किंवा घाटे, आपलेच दात नि आपलेच ओठ. दोन्ही आपलेच फक्त योग्य काय नि अयोग्य काय याची समज हवी. मारहाण करुन प्रश्न सुटत नाही. सुजाण नागरिक कमी होत आहेत एवढेच. सण उत्सव जयंती किंवा घरगुती कार्यक्रम असो तो जरुर साजरा करा फक्त सामाजिक भान असावे. विद्यार्थी,वृद्ध किंवा आजारी आपलेच कुणी तरी असतील त्यांना शारीरिक किंवा मानसिक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी’, अशी कमेंट दुसऱ्या युजरने केली आहे.