Marathi Actress Post Aarti Solanki Post About Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. गेल्या १० ते १५ दिवसांत अनेक मोठमोठ्या मंडळांच्या गणपती बाप्पांचं जल्लोषात आगमन झाल्याचं पाहायला मिळालं. या आगमनांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण, या सगळ्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरल्या आहेत यंदाच्या ‘बॅलन्सिंग गणेशमूर्ती’! गणपती बाप्पांच्या बहुतांश मूर्ती यंदा बॅलन्सिंग स्वरुपात आहेत. याबाबत नेटकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काही जणांनी मूर्तिकारांच्या कौशल्याचं कौतुक केलं आहे. तर, काही नेटकऱ्यांनी अशा स्वरुपाच्या मूर्ती बनवणं अजिबात योग्य नाहीये असं स्पष्ट मत मांडलं आहे.
याबाबत लोकप्रिय अभिनेत्री आरती सोलंकीने सुद्धा प्रतिक्रिया देत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. “गणपती बाप्पाचं रूप मुळातच सुरेख, देखणं आहे. त्यामुळे बाप्पाला वेगळ्या रुपात घडवण्याची काय गरज?” असा सवाल आरतीने तिच्या पोस्टद्वारे उपस्थित केला आहे.
आरती सोलंकी म्हणते, “अरे हे काय चालवलंय? गणपती बाप्पाचं रूप मुळातच सुरेख, देखणं…अगदी गोड असताना बाप्पाला वेगळ्या रुपात घडवण्याची काय गरज? मंडपात देखावा हवा तो करा…खरंतर त्याचीही गरज नाही. पण, मंडळांच्या स्पर्धेत वाढ झालीये तर काय करणार? सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे बॅलन्सिंगच्या नावावर बाप्पाला अक्षरश: हवेत लटकवून ठेवणं हे योग्य आहे का? वाईट वाटतं बाप्पासाठी…सण आणि बाप्पा हा पारंपरिक हवा. स्वत:च्या मुलांना फॅन्सी ड्रेस स्पर्धेत तयार करतात तसं बिचाऱ्या बाप्पाला सजवत आहेत. माफ करा बाप्पा…तुम्ही बुद्धीचे देवता आहात, आता याल तर सगळ्यांना चांगली बुद्धी द्या!”

दरम्यान, आरती सोलंकीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, छोट्या पडद्यावरच्या विनोदी कार्यक्रमांमधून अभिनेत्री आरती सोलंकी घराघरांत लोकप्रिय झाली. तिने आजवर अनेक सिनेमांमध्येही काम केलेलं आहे. याशिवाय ती ‘बिग बॉस मराठी’मध्ये देखील झळकली आहे. आरती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सामाजिक तसेच मनोरंजन विश्वातील घडामोडींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आरती नेहमीच स्पष्ट मत मांडताना दिसते.
