Marathi Actress Abhidnya Bhave Instagram Post : मराठी कलाविश्वातले अनेक कलाकार आपल्या सोशल मीडियाद्वारे आजूबाजूच्या राजकीय, सामाजिक विषयांवर आपली मतं व्यक्त करत असतात. तसेच अनेकजण नैसर्गिक समस्यांवरसुद्धा अनेकजण स्पष्टपणे बोलताना दिसतात. अशातच लोकप्रिय मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेने वृक्षतोडीमुळे होणाऱ्या निसर्गाच्या ऱ्हासावर काळजी व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे.

अभिज्ञा भावे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसते. त्याचबरोबर आपल्या सोशल मीडियाद्वारे ती तिच्या दैनंदिन अपडेट्ससुद्धा देत असते. अशातच तिने नुकतीच शेअर वृक्षतोडीबद्दलची पोस्ट सध्या लक्ष वेधून घेत आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीवर अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिज्ञा असं म्हणते, “विकासाच्या नावाखाली ज्या वेगाने झाडे तोडली जात आहेत, ते पाहता प्रगत शहर पाहण्यासाठी आपल्यापैकी कोणी जिवंत राहील असे मला वाटत नाही. या विकासाचे परिणाम आपल्याला आताच जाणवू लागले आहेत. आपण सध्या ज्या विषयांवरून भांडत आहोत ते सगळे किरकोळ आहेत, कारण जर श्वास घ्यायला हवाच उरली नाही, तर इतर कशालाही महत्त्व राहणार नाही.”

“घरात बसून शांतपणे व्हिडिओ पाहणे आणि ‘मला काय फरक पडतो’ असे म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे आपल्या सर्वांना महागात पडणार आहे. माझा विकासाला अजिबात विरोध नाही. पण भारताची नागरिक म्हणून निसर्गाचा समतोल राखून केलेला विकास मला हवा आहे”, असंही ती पुढे म्हणाली आहे.

त्यानंतर अभिनेत्री म्हणाली, “विकास हा व्हायलाच हवा. आज आपल्या निसर्गाला आपली नितांत गरज आहे. ही गरज तुमच्या कुटुंबापेक्षा, समाजापेक्षा आणि तुम्ही ज्या राजकीय अजेंड्याला पाठिंबा देता, त्यापेक्षाही मोठी आहे. केवळ राजकीय पाठिंब्यामुळे तुम्ही हे सर्व शांतपणे सहन करत असाल, तर ते चुकीचे आहे.”

शेवटी अभिज्ञा म्हणाली, “तुम्हाला दुसरे काही करता येत नसेल, तर किमान शांत बसू नका. बोला, व्यक्त व्हा आणि तुमच्या आजूबाजूला काहीही चुकीचे घडताना दिसले तर ते थांबवा. आजच आपली जबाबदारी ओळखा. कारण – हे सगळं लवकरच आपल्या सगळ्यांच्या अंगाशी येणार आहे आणि त्यावेळी तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही ना तुमचे आदर्श, ना कोणताही राजकीय पक्ष, ना तुमचा समाज. त्यामुळे आताच बोला, नाहीतर भविष्यात त्रास सहन करायला तयार राहा.”

abhidnya bhave post on tree cutting
अभिज्ञा भावेने शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, अभिज्ञाबद्दल सांगायचे झाल्यास, ती टेलिव्हिजन विश्वातली लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने हिंदीसह मराठी मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. सध्या अभिनेत्री झी मराठी वाहिनीवरील ‘तारिणी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.