Aditi Sarangdhar Fitness Transformation : ‘वादळवाट’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अदिती सारंगधर सध्या तिच्या फिटनेसमुळे चर्चेत आहे. अदितीने गेली वर्षभर मेहनत करून आपलं वजन घटवलं आहे. सध्या ती ‘झी मराठी’च्या ‘सनई चौघडे’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारतेय. तिच्या पात्राचं नाव आहे तेजस्विनी खानोलकर. तिला दोन मुलं अन् एक मुलगी असते. तेजस्विनी अतिशय हुशार आणि सर्वांवर अधिकार गाजवण्याचा तिचा स्वभाव आहे. मालिका पाहून आणि यामध्ये तेजस्विनीचा लूक पाहून अनेकजण अदितीला ‘संतूर मॉम’ अशी कॉम्प्लिमेंट देतात. याबाबत अभिनेत्रीने नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
अदिती सारंगधर म्हणते, “आता मालिका पाहून सगळे मला ‘संतूर मॉम’ म्हणत आहेत. पण, या फिटनेसाठी मी गेली वर्षभर खरंच खूप जास्त मेहनत घेतलीये. स्किनची काळजी घेतली, नित्यनियमाने वर्कआऊट करतेय, सगळं डाएट फॉलो केलंय…याशिवाय मी माझ्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेतलीये. आता लोक खरंच म्हणत आहेत की तू बारीक झालीयेस. त्यामुळे, अशा प्रतिक्रिया ऐकून खरंच खूप छान वाटतं.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी धने-जिऱ्याचं पाणी दररोज पिते. Apple cider vinegar माझ्याकडे असतं, ज्यामुळे जेवणानंतर उत्तम पचन होतं. याशिवाय जेवणात मी राजगिऱ्याची भाकरी खाते.”
“आपण आपलं वय स्वीकारलं पाहिजे. आपण आयुष्यात Acceptance वाढवला तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. आता मी म्हटलं की, मला लीड भूमिकाच करायच्या आहेत…अर्थात लीड भूमिका माझ्या वयाच्या अभिनेत्री सुद्धा करत आहेत. पण, मला सांगायचं इतकंच आहे की, आपण वय Accept केलं की, आपण जास्त छान दिसतो असं मला वाटतं. आम्हाला ही भूमिका टिपिकल आईसारखी साकारायची नव्हती. अर्थात ती आता कशी आई आहे…नेमकी कोण आहे याचा उलगडा होईलच.” असं अदितीने सांगितलं.
अदितीने फिटनेसला प्राधान्य देत सहा महिन्यांत स्वत:ला पूर्णपणे ट्रान्सफॉर्म केलं आहे. तिने हा फिटनेसचा प्रवास फोटो अन् पोस्ट शेअर करत सुद्धा सर्वांना सांगितला आहे.
“६ महिने..एक निर्णय अन् माझं पूर्णपणे एक वेगळं रूप. जेव्हा हा प्रवास मी सुरू केला तेव्हा मला झटपट उपाय नको होते. मला फक्त निरोगी, सशक्त आणि आत्मविश्वासू बनायचं होतं. आज या दोन्ही फोटोंकडे पाहून मी अभिमानाने सांगू शकते की, या फिटनेस जर्नीमध्ये सातत्य राखणं हा मी घेतलेला सर्वात योग्य निर्णय होता. हा बदल (transformation) सोपा नव्हता.” असं कॅप्शन अदितीने या पोस्टला दिलं आहे.
अदितीच्या या ट्रान्सफॉर्मेशनचं चाहत्यांनी सुद्धा भरभरून कौतुक केल आहे. याशिवाय ‘सनई चौघडे’बद्दल सांगायचं झालं तर, ही मालिका झी मराठीवर दररोज रात्री ८:३० वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये अदिती भूमिका साकारत असलेल्या तेजस्विनीला जय, गौतम आणि साक्षी अशी तीन मुलं आहेत. खानोलकरांचं बिझनेस इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव असतं. हा बिझनेस प्रामुख्याने तिचा मोठा मुलगा जय सांभाळत असतो. आपल्या दोन्ही मुलांची…श्रीमंत घरच्या घरंदाज मुलींशी लग्न व्हावीत अशी तिची इच्छा असते. आता हे घडणार की नाही… हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.
