Aishwarya Narkar Slams Troller : मनोरंजन विश्वातील कलाकारांसाठी ट्रोलिंग काही नवीन नाही. कपडे अन् लुकवरून कलाकारांना कायमच नकारात्मक प्रतिक्रिया येत असतात. विशेषत: अभिनेत्रींना अशा नकारात्मक प्रतिक्रिया आणि ट्रोलिंगला अनेकदा सामोरे जावे लागले आहे. मात्र, काही अभिनेत्री अशा ट्रोलिंगला न जुमानता स्पष्टपणे उत्तर देतात.
सोशल मीडियावरील ट्रोलर्सना स्पष्ट शब्दांत सुनावणाऱ्या काही अभिनेत्रींपैकी एक म्हणजे, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर ट्रोलर्सना आपल्या स्पष्ट शब्दांत नेहमीच उत्तर देत असतात. ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्या आपले अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच त्यांच्या नवनवीन प्रोजेक्टबद्दलची माहिती देत असतात.
ऐश्वर्या नारकर आपला फिटनेसही जपताना दिसतात. त्यामुळे व्यायाम किंवा योगा करतानाचे व्हिडीओसुद्धा ते आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओला अनेक नेटकरी चांगलाच प्रतिसाद देतात. त्यांच्या लुक, व्यायामाचे कौतुक करतात. मात्र, काही नेटकरी त्यांच्या पोस्टवर मुद्दामहून नकारात्मक कमेंट करतात. ऐश्वर्या नारकरसुद्धा या ट्रोल करणाऱ्यांना वेळोवेळी चांगलंच सुनावतात.
अशातच त्यांनी नुकतेच एका ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला चोख उत्तर दिलं आहे. त्यांनी या कमेंटचा स्क्रीनशॉट आपल्या स्टोरीवर शेअर केला आहे. नेटकऱ्याने ऐश्वर्या नारकरांच्या एका पोस्टवर “नवरा म्हातारा झालाय अन् तू जवान व्हायला निघालीय”, अशी कमेंट करत त्यांना ट्रोल केलं आहे. अभिनेत्रीने या कमेंटचा स्क्रीनशॉट आपल्या इन्स्टाग्रामवरील स्टोरीवर शेअर केला आहे.
ट्रोल करणाऱ्याने इन्स्टाग्राम बायोमध्ये ‘एकही लक्ष्य हिंदू राष्ट्र’ अशी ओळ लिहिली आहे. यावरून ऐश्वर्या नारकरांनी “हिंदू राष्ट्राची लाज राखा”, म्हणत चांगलंच ट्रोलरला चांगलंच सुनावलं आहे. तसेच त्यांनी ट्रोलरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा स्क्रीनशॉटसुद्धा शेअर केला आहे.

ऐश्वर्या नारकरांना हा अनुभव काही पहिल्यांदाच आला आहे असं नाही. यापूर्वीही त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. पण प्रत्येकवेळी ऐश्वर्या नारकर यांनी सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सना सुनावलं आहे. अनेकदा त्या पती व अभिनेते अविनाश नारकर यांच्याबरोबर डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. त्यावेळीही दोघांना मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
दरम्यान, ऐश्वर्या नारकरांनी आजवर अनेक मराठी मालिका व सिनेमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. अभिनयाबरोबरच त्यांनी नुकताच तितीक्षा तावडे अन् सुरूची अडारकर या अभिनेत्रींबरोबर साड्यांचा व्यवसायसुद्धा सुरू केला आहे.
