‘लव्ह लग्न लोचा’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच अक्षया गुरव. अक्षयाने नुकताच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. अक्षयाने २०१७ मध्ये दिग्दर्शक भूषण वाणीसह लग्न केलं होतं. मात्र, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने या दोघांनी जवळपास ८ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतल्याचं सांगितलं आहे. नवऱ्यापासून विभक्त झाल्यावर अनेक महिन्यांनी अक्षयाने यावर मौन सोडलं आहे.

“मध्यतंरी तू नवऱ्यापासून विभक्त झाल्याच्या चर्चा होत्या.” याबाबत ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षया गुरव म्हणाली, “जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा अनेकांनी ही बातमी प्रसारित केली होती. माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा झाली, त्यामुळे सुरुवातीला मला हे सगळं पटलं नाही. पण, नंतर कुठेतरी वाटलं की, आपल्याला याबद्दल कधीतरी बोलावंच लागेल. जे काही लोकांनी वाचलंय, पाहिलंय…तर हो! ही गोष्ट खरी आहे पण, आम्ही आजही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही दोघंही एकाच इंडस्ट्रीतले आहोत त्यामुळे पुढे-मागे जर अशी वेळ आली, तर एकत्र काम करायला मला आवडेल आणि त्यालाही आवडेल. आपण गोष्टी लेट गो करायला शिकलं पाहिजे.”

अक्षया पुढे म्हणाली, “माझ्या जवळच्या व्यक्तीने मला सांगितलं होतं की, प्रेमात माणसाने नेहमी नि:स्वार्थी असलं पाहिजे…स्वार्थी नाही. त्यामुळे एखाद्याला आपल्या आयुष्यातून कायमच निघून जायचं असेल तर आपण त्याला जाऊ द्यायचं. त्याला थांबवण्यात काहीही अर्थ नाहीये. मग ती मैत्री असो, कुटुंब असो किंवा नवरा-बायकोचं नातं असो…तुम्ही कोणालाही थांबवू शकत नाही. यादरम्यान खूप त्रास होतो, मी रडलेय…पण, आपलं आयुष्य इथेच थांबत नाही. बरं दु:ख चेहऱ्यावर दिसतं…कलाकार असल्याने त्याकडे लक्ष ठेवावं लागतं. म्हणूनच मी माझं वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळं ठेवते. आता पुढे बघुयात आयुष्य कुठे घेऊन जातंय.”

“गेल्या दोन वर्षांपासून आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडत आहेत. खरंतर, या सगळ्याबद्दल मी पहिल्यांदाच या पॉडकास्टमधून सांगतेय. आता आयुष्याला नवीन संधी देण्याबद्दल सांगायचं झालं तर, एकदा एखादं नातं बिघडलं म्हणून तुमच्या आयुष्यात पुन्हा तेच होईल असं काहीच नाहीये. त्यामुळे लग्न संस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला लग्न करायचंय, मलाही संसार करायचा आहे…खरंतर, मला एक छान मुलगी हवीये. पुढे, पुन्हा एकदा स्टेबल होण्याची माझीही स्वप्न आहेत. एकटं राहू नये असं खूप जण म्हणतात…मलाही आयुष्यात एक अशी व्यक्ती हवीये, त्या व्यक्तीबरोबर मी सगळ्या गोष्टी शेअर करू शकते. आयुष्यात एखादी गोष्ट घडून गेली म्हणजे परत तेच होईल असं नाहीये. त्यामुळे मी आता आयुष्याकडे फार सकारात्मक राहून बघते.” असं अक्षयाने सांगितलं. तसेच भविष्यात जो मला कधीही सोडून जाऊ नये असा पार्टनर हवाय असंही ती म्हणाली.