Amruta Khanvilkar on Bigg Boss : सध्या ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू आहे. हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो असून, त्यात सहभागी झालेल्या स्पर्धकांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या शोविषयी अनेक जण त्यांची विविध मतं व्यक्त करीत आहेत. अशातच अमृता खानविलकरनं ‘बिग बॉस’बद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘बिग बॉस’ शोची प्रेक्षकांमध्ये बरीच क्रेझ आहे. त्यामुळे अनेक जण आपल्या आवडत्या कलाकारांना ‘बिग बॉस’मध्ये बघण्याची इच्छा व्यक्त करीत असतात. अनेक कलाकारांना चाहते ‘बिग बॉस’मध्ये जाण्याविषयी थेट विचारतातही. अशातच अमृता खानविलकरला एका मुलाखतीत ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याबद्दल प्रश्न विचारला गेला. तेव्हा अभिनेत्रीनं यावर स्पष्ट उत्तर दिलं.

‘फिल्मीग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत अमृताला ‘बिग बॉस’मध्ये जाण्याविषयी विचारलं गेलं. त्यावर अमृता म्हणाली, “अजिबात नाही. मला घरून फक्त या एकाच शोसाठी मनाई आहे. तू हा शो करू नकोस, असं त्यांचं म्हणणं आहे. हिमांशु आणि आईलासुद्धा मी यात आलेलं नको आहे. खरं तर माझ्या आईला ‘बिग बॉस’ आवडतं; पण ती मला म्हणते की, तू तिकडे गेलीस तर मार खाऊन येशील किंवा कुणाला तरी मारून तरी येशील आणि मी तर मार नक्कीच नाही खाणार. त्यामुळे ते मला नको आहे.”

“तुमच्या काही वैयक्तिक गोष्टी…”

त्यानंतर तिनं म्हटलं, “काही गोष्टी या पडद्यामागे असलेल्याच चांगल्या असतात. तुमच्या काही वैयक्तिक गोष्टी असतात, ज्या वैयक्तिकच असल्या पाहिजेत. सर्व काही सोशल मीडियावर किंवा कॅमेऱ्यासमोर यायला हवं, असं मला वाटत नाही. त्यामुळे मला ते करायचंच नाही.”

“रिअ‍ॅलिटी शो करायला मला…”

त्यानंतर अमृतानं सध्या कुठल्याच रिअ‍ॅलिटी शोमध्ये यायची इच्छा नसल्याचंदेखील म्हटलं. त्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, “मी ‘नच बलिये’ हा शो जिंकला आहे, ‘खतरों के खिलाडी’ या शोचा मला अनुभव आहे. त्याशिवाय ‘झलक दिख ला जा’ या शोमध्येही मी सहभागी झाले होते. त्यामुळे मी जे जे रिअ‍ॅलिटी शो केले, ते खूपच एन्जॉय केले. ‘खतरों के खिलाडी’ हा शो सोडल्यास बाकी ‘झलक दिख ला जा’ आणि ‘नच बलिये’ हे शो डान्सशी संबंधित होते. ते करायला मला खूपच मज्जा आली.”

अमृताच्या कामाबद्दल थोडक्यात…

दरम्यान, अमृताच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास तिची नुकतीच ‘तस्करी’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यात बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. त्याशिवाय अमृताचं रंगभूमीवर ‘लग्न पंचमी’ हे नाटकसुद्धा सुरू आहे. या नाटकातून अभिनेत्रीनं पहिल्यांदाच रंगभूमीवर एन्ट्री केली आहे. या नाटकात तिच्यासह अभिनेता स्वप्नील जोशी हासुद्धा मुख्य भूमिकेत आहे.