मराठी सिनेसृष्टीत सध्या अनेक स्टारकिड्स एन्ट्री घेत आहेत. गेल्या काही वर्षांत देखील बहुतांश लोकप्रिय कलाकारांच्या मुलांनी मालिका तसेच सिनेविश्वात पदार्पण केल्याचं पाहायला मिळालं. यापैकीच एक लोकप्रिय नाव म्हणजे अभिनेत्री अनघा अतुल; ती पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची लेक आहे. आज वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘वेध भविष्याचा’ आणि ‘घेतला वसा टाकू नको’ या पौराणिक मालिकांमुळे अतुलशास्त्री भगरे यांना घराघरांत ओळखलं जातं, त्यांची लोकप्रियता महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणात आहे. अनघाने आज वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील पहिला फोटो अनघाच्या बालपणीचा आहे. या सगळ्या फोटोंमध्ये अनघा आणि तिच्या बाबांचं बॉण्डिंग किती सुंदर आहे हे पाहायला मिळतंय.
अनघा अतुल लिहिते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा! मला आशा आहे की, माझी मुलं माझ्याकडे तसंच पाहतील जसं मी तुमच्याकडे पाहतेय…बाबा तुम्हाला निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा”
अनघाने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अद्वैत दादरकर, रेश्मा शिंदे, सुरुची अडारकर, ऋतुजा बागवे, सिद्धार्थ बोडके, शर्मिला शिंदे, ऋतुजा कुलकर्णी, भाग्यश्री मोटे या कलाकारांनी अनघाच्या पोस्टवर खास कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने जवळपास अडीच वर्षांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. दीपा, श्वेता, सौंदर्या, कार्तिकची भूमिका साकारणारे कलाकार घराघरांत प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले. यामध्ये अनघा अतुलने खलनायिका श्वेताची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका सर्वत्र तुफान गाजली. यानंतर अनघाने ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ या मालिकेत सुद्धा काम केलं. सध्या अनघा प्रशांत दामलेंच्या ‘शिकायला गेलो एक’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
