Anuja Sathe on decision of not to having kids: मराठी हिंदी मालिका, वेब सीरिज, चित्रपट व नाटक या माध्यमांतून अभिनेत्री अनुजा साठेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आज मराठी मनोरंजन विश्वातील ती आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
आता अभिनेत्री तिच्या भूमिकेमुळे नाही, तर तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुलं न होऊ देण्याचा निर्णय का घेतला, यावर वक्तव्य केलं. अनुजा साठे नेमकं काय म्हणाली, हे जाणून घेऊ…
“अजून चार असतील तरी…”
अनुजा साठेनं नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अनुजाला विचारण्यात आले की, तू आणि सौरभनं मुलं होऊ न देण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला होता का? त्यावर अनुजा म्हणाली, “हो. खरं सांगायचं, तर आम्हाला प्राणी खूप आवडतात. आम्ही प्राणीप्रेमी आहोत. त्यामुळे आता आमच्याकडे चार श्वान आहेत. अजून चार असतील तरी हरकत नाही. ती आमची मुलंच आहेत. आम्ही त्यांना आमच्या मुलांप्रमाणेच जपतो. त्यांच्याबरोबर तसेच वागतो.”
ती पुढे म्हणाली, “मातृत्वाची भावना माझ्यामध्ये नाही का? तर ती भावना माझ्यामध्ये आहे. पण, मला मुलांपेक्षा प्राण्यांप्रति जास्त मातृत्वाची भावना वाटते. मला जर एक पाऊल मागे जायचं आहे, तर इतर कोणाहीपेक्षा त्याचा सर्वांत जास्त परिणाम माझ्यावर होणार आहे. मी खूप महत्वाकांक्षी आहे. हे फक्त करिअरबाबत नाही, तर सगळ्याच बाबतीत मी महत्त्वाकांक्षी आहे.”
“आज मुलं आहेत म्हणून मला अमुक चार गोष्टी कराव्याच लागतील किंवा आर्थिकदृष्ट्या माझ्यावर जबाबदारी येणार, माझ्यावर आर्थिक भार पडणार आहे. कारण- आजकाल काहीच स्वस्त नाही. आपण खूप नशीबवान होतो. आपल्या शिक्षणाला काही विशेष पैसे लागलेच नाहीत. पण, आज ज्या दरानं गोष्टी महाग झाल्या आहेत. त्या मुलाला या जगात आणून सगळ्याच गोष्टीत तडजोड करणं मला पटत नाही. आणि मुलांबद्दल माझ्या मनात मातृत्वाची भावना नाही, हा एक मुद्दा आहेच. हे तथ्य आहे की, मला प्राण्याविषयी जास्त मातृत्व वाटतं.”
अनुजा साठेनं अभिनेता सौरभ गोखलेबरोबर २०१३ साली लग्नगाठ बांधली. ‘लगोरी’, ‘एक थी बेगम’, ‘मॅच फिक्सिंग’, ‘पेशवा बाजीराव’, ‘परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण’ अशा चित्रपट, मालिका व वेब सीरिजसाठी अभिनेत्रीची ओळख आहे. आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.