मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने यंदा १४ फेब्रुवारीला तनुज गोवळकरशी लग्नगाठ बांधली. अपूर्वा आणि तनुज या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. घटस्फोटानंतर अपूर्वा जवळपास ९ वर्षे एकटी होती. या काळात तिने करिअरवर संपूर्ण लक्ष केंद्रीत केलं होतं. नुकत्याच, सुलेखा तळवलकर यांना दिलेल्या मुलाखतीत अपूर्वा आणि तनुज या दोघांनीही दुसऱ्या लग्नाबद्दल आणि आयुष्याला दिलेल्या दुसऱ्या चान्सबद्दल आपलं मत सांगितलं.

अपूर्वा नेमळेकर म्हणते, “पहिल्या लग्नातून… त्या टॉक्सिसिटीमधून तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुम्ही पटकन नॉर्मल होऊ शकत नाही. लोकांना असं अपेक्षित असतं की, तुम्ही नॉर्मल व्हा किंवा जे झालं ते विसरून जा…तर ते पटकन विसरता येत नाही. त्याला वेळ जातो…माझ्या बाबतीत तर ९ वर्षं गेली. मी त्या नऊ वर्षात खूप वेळ घेतला…मला काय हवंय, काय नकोय याचा विचार केला. आता मी ज्या क्षेत्रात आहे त्यात मी सलग १८ तास तरी बिझी असते. त्यामुळे माझ्याकडे अरेंज मॅरेज करणं हाच पर्याय होता.”

“माझ्या आई-बाबांचा सुखाचा संसार मी पाहिलाय. त्यामुळे आपलाही छान संसार व्हावा अशी माझी इच्छा होती…त्यामुळे बऱ्याचदा खचूनही मी हार मानली नाही. एक दिवस माझ्याही आयुष्यात नक्की येईल…यावर माझा विश्वास होता आणि तो दिवस आला. त्यामुळे खचून न जाता स्वत:वर विश्वास ठेवा. मी त्या ९ वर्षांत खूप काम केलं, मालिका केल्या…नाटकात काम केलं. त्यादरम्यान, शेवंतासारखं लोकप्रिय पात्र मिळालं. पण, त्या लोकप्रियतेचा आनंद घेता आला नाही कारण, वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. मी माझ्या बाबांना गमावलं. बाबा गेले, भाऊ गेला…हा काळ खूप कठीण होता. मी हळुहळू या सगळ्यातून बाहेर आले.” असं अपूर्वाने सांगितलं.

यावर तनुज म्हणाला, “घटस्फोटानंतर निश्चितच त्रास होतो पण, त्यानंतर आयुष्यात मला काय हवंय याकडे मी लक्ष केंद्रीत केलं. मी स्वत:साठी वेळ घेतला, फिटनेसकडे लक्ष दिलं, करिअरला पुन्हा नव्याने सुरुवात केली. अपूर्वाला भेटण्याआधी ३ वर्ष मी सुद्धा एकटाच होतो. दुसऱ्या लग्नाचा निर्णय तुम्ही फार विचार करून घ्यायला पाहिजे. जर, तुम्ही मनाने तयार नसाल तर उगाच एक्सप्लोर करण्यासाठी हा निर्णय घेऊ नका.”

“तनुजसारखा समजूतदार व्यक्ती माझ्या आयुष्यात आलाय, मी खरंच स्वत:ला खूप लकी समजते. हा असा व्यक्ती माझ्या आयुष्यात येण्याची गरज होती. त्या ९ वर्षात असं कधीच नव्हतं वाटलं की, मी पुन्हा प्रेमात पडेन. कारण, मी सतत स्वत:ला कामात व्यग्र ठेवलं होतं.” असं अपूर्वाने सांगितलं.