Bhagyashree Dalvi : यंदाच्या वर्षात अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकले. तर, काही कलाकारांनी सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिल्याचं पाहायला मिळालं. मराठी मालिकाविश्वातील अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपलं प्रेम जाहीरपणे व्यक्त केलं आहे. ‘दार उघड बये’, ‘सांग तू आहेस का?’, ‘खरंच तिचं काय चुकलं’ या मालिकांमधून ही अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली. तिचं नाव आहे भाग्यश्री दळवी.

भाग्यश्री सध्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. तिच्या भूमिकेचं नाव आहे तारा, ती भैरवीची मुलगी असते. सध्या सोशल मीडियावर भाग्यश्रीच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक गोड पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे.

भाग्यश्रीने तिच्या बॉयफ्रेंडसह एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने “मेरी नजर दीवानी बस तुम तक” असं गोड कॅप्शन दिलं आहे. तसेच या पोस्टच्या हॅशटॅगमध्ये तिने ‘Mine’ आणि ‘मैत्रीची १४ वर्षे’ असं लिहिलं आहे. तिच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे सुमेध म्हात्रे. त्याचं देखील मनोरंजन विश्वाशी खास कनेक्शन आहे. सुमेध ‘स्टार प्रवाह’चा एक्झिक्युटिव्ह कंटेट प्रोड्युसर आहे.

भाग्यश्रीच्या या पोस्टवर तिची सहकलाकार प्राप्ती रेडकरने, “धनुष आणि सोनम…किती गोड आहात यार दोघं” अशी कमेंट केली आहे. याशिवाय रेश्मा शिंदे, महिमा म्हात्रे, समृद्धी केळकर, मोनिका दबाडे, अदिती द्रविड, सुरभी भावे, विजय आंदळकर, सानिया चौधरी अशा अनेक कलाकारांनी भाग्यश्रीने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट्स करत या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

यापूर्वी सुमेधने सुद्धा एक खास व्हिडीओ भाग्यश्रीबरोबर शेअर केला होता. यामध्ये दोघांनी ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातील पोझ रिक्रिएट केली होती. याला सुमेधने “प्यार दोस्ती है…” असं कॅप्शन दिलं होतं.

दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत भाग्यश्री दळवीसह प्राप्ती रेडकर, साईंकित कामत, सुलेखा तळवलकर, मेघा धाडे, आशिष कुलकर्णी, मयूर खांडगे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत लीप आला होता. यानंतर साईराज आणि वेदांती या दोन बालकलाकारांची एन्ट्री मालिकेत झालेली आहे.