Marathi Actress Bhagyashree Nhalave : मराठी मनोरंजन विश्वातल्या एका लोकप्रिय अभिनेत्रीबाबत दु:खद बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीच्या आईचं निधन झालं आहे. ही अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री न्हाळवे. या संदर्भात तिनं सोशल मीडियावर पोस्ट करीत माहिती दिली आहे.

‘कुंकू, टिकली आणि टॅटू’, ‘रमा राघव’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ तसंच ‘माटी से बंधी डोर’ या मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री न्हाळवे. अनेक दिवसांपासून भाग्यश्रीची आई आजारी होती. अशातच तिच्या आईने या जगाचा निरोप घेतला. अभिनेत्रीने आईबरोबरचा एक फोटो पोस्ट करत दु:ख व्यक्त केलं आहे.

या पोस्टमध्ये भाग्यश्री म्हणते, “आई! आज माझ्या लग्नाला फक्त दोन महिने पूर्ण होत आहेत; पण दोन महिन्यांत आईनं मला एकही फोन केला नाही. का तर ‘सासरी गेलेल्या मुलीला आईनं सारखा फोन करू नये. तिचं संसारात लक्ष लागत नाही’. अशा मताची माझी आई मला एकही फोन न करता देवाघरी गेली आणि आता माझ्या आईचा कधीच फोन येणार नाही. लग्नाला दोन महिनेही झाले नाहीत आणि तू मला सोडून गेलीस हे मला मान्य होत नाहीये. मला शेवटपर्यंत तुझ्यापाशी राहायचं होतं म्हणून मला लग्न नव्हतं करायचं. पण तू…, ‘माझी शेवटची इच्छा आहे. तू माझ्यासाठी लग्न कर आणि मागे वळून बघू नकोस, माझं कायपण होईल; पण तू मागे वळून यायचं नाहीस. मुलगी म्हणून तू खूप जास्त केलं आहेस. तू आता तुझा विचार कर माझ्यासाठी’ खूप ठाम तिचा निर्णय. एका भेटीत मला तिनं मला लग्नाचा निर्णय घ्यायला भाग पाडलं. मी काय करते हे मला तेव्हा लक्षात आलं नाही. फक्त आई सांगतेय आणि आईची इच्छा म्हणून या लग्नाला उभी राहिले. पण, आई आज तू गेल्यावर मला कळलं आहे की, तू माझ्यासाठी निवडलेला मुलगा आणि घर खरंच माझ्यासाठी किती बरोबर आहे.”

त्यानंतर ती म्हणते, “तुझ्यासाठी मी लग्न केलं; पण तू फक्त माझं लग्न पाहिलं. माझा संसार पाहायला तू मला आयुष्यभर हवी होतीस. माझ्या नारायणाला आता कोण नमस्कार करेल सांग? दर पौर्णिमेला मी त्या सत्यनारायणाला दिवा लावायचे आणि तुझ्यासाठी प्रार्थना करायचे. पण, कालच्या पौर्णिमेला मी तुझ्या नारायणाबरोबर तुझ्या चितेला नमस्कार करत होते. मला तू अशी सोडून जायला नको होतीस.. आईला लेकराचं चांगलंच कळतं हे खरंच; पण तरीही आई तू मला हवी होतीस. आता मला कोण राणा म्हणेल. मला संसारात पाडलंस आणि तू मात्र निघून गेलीस. तू सांगितल्याप्रमाणे आई मी मागे वळून बघणार नाही हे तुला माझं वचन आहे.”

दरम्यान, भाग्यश्रीच्या आईचं प्रदीर्घ आजारानं निधन झाले असून, गेल्या वर्षभरापासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. गेल्या आठवड्यात अचानक तिच्या आईची प्रकृती अधिकच खालावली. ही बाब कळताच भाग्यश्री मुंबईहून तातडीनं पुण्याला गेली होती. भाग्यश्रीच्या आईच्या निधनानंतर मराठी कलाविश्वातून दुःख व्यक्त केलं जात आहे.