Marathi Actress Emotional Post : लोकप्रिय मराठी अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवेच्या आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. भावूक पोस्ट शेअर करत तिनं याबद्दलची माहिती दिली होती. या दु:खातून अभिनेत्री अजूनही सावरलेली नाही. तिनं आईच्या आठवणीत पुन्हा एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. आईबरोबरचा फोटो पोस्ट करीत तिनं आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.
भाग्यश्रीच्या आईचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं असून, गेल्या वर्षभरापासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खूप खालावली होती. आईच्या प्रकृतीबद्दल कळताच भाग्यश्रीनं तातडीनं पुणे गाठलं होतं. मात्र, ३० जानेवारी रोजी अभिनेत्रीच्या आईचं निधन झालं. इन्स्टाग्राम स्टोरीवर आईबरोबरचा फोटो शेअर करत तिनं “देवा, तू माझी आई का नेलीस?” या शब्दांतून असह्य वेदना व्यक्त केल्या होत्या.
आईच्या आठवणीत भाग्यश्री पुन्हा भावूक झाली आहे. सोशल मीडियाद्वारे तिनं या भावना व्यक्त केल्या आहेत. पोस्टमध्ये ती म्हणते, “महाराष्ट्रात नवीन लग्न झालेल्या मुली वर्षभर नवीन नवरी असतात. पहिल्या वर्षातले सगळे सण हे तिचे असतात. नव्याचे नऊ महिनेपण झालं नाही. माझ्या बाबतीत तसं काही घडणार त्याआधीच आई तुझ्या तेराव्याचं जेवण मला जेवावं लागलंय. प्रत्येक घासागणिक तू माझ्या डोळ्यांतल्या पाण्याबरोबर तरंगत होतीस. मनातल्या मनात मी तुला विचारत होते, याचकरता का मला तू सौभाग्यवती केलंस?”
त्यानंतर ती म्हणते, “मला कोणतेही सणवार नको होते गं आई. मला तू हवी होतीस. खूप काही बोलायला. खूप काही समजून घ्यायला. खूप काही समजवून सांगायला. तू एक थेरपिस्ट होतीस. तुझ्याशी सगळं बोलून मला हलकं वाटायचं; पण आता कोणाशीur बोलावंस वाटत नाहीये. तुला घेऊन खुप ठिकाणी फिरायचं होतं. घरात झोपाळा बसवायचा राहून गेला. तुला एक नातवंड द्यायचं होतं. आई तुझ्या अशा जाण्यानं मला खूप एकटं वाटतंय. फिरून फिरून तूच दिसतेस, तुझेच भास होतात. अंगावर डोंगर ठेवलाय असं वाटत राहतं.”
आईच्या आठवणीत भाग्यश्री न्हाळवेची भावुक पोस्ट
शेवटी भाग्यश्री म्हणते, “माझी आई गेली तेव्हा मी मलेशियात होते. माझ्या आणि तुझ्या शेवटच्या भेटीसाठी झालेली ताटातूट कधीच कोणाला समजणार नाही. जाता-जाता पण तुझ्या या राणूला एक कठीण निर्णय घ्यावा लागला की, माझ्या आईला खूप गार लागतं. जिवंतपणी खूप यातना तू भोगल्यास. तेव्हा तुला तुझ्या शेवटच्या क्षणी मला तुला यातना नाही द्याव्याशा वाटल्या आणि एका क्षणात सगळं मी निमूटपणे स्वीकारलं. कोणी माझा विचारही केला नाही. मला तुला शेवटचं भेटताही येणार नाही, हे ऐकल्यावर मी जमिनीवर कोसळून पडले. आईची शेवटची भेट चुकली, याची खंत घेऊन मला पूर्ण आयुष्य जगावं लागणार आहे. या विचारानं मला अर्धमेल्यासारखं वाटत आहे. आता माहीत नाही पुढे काय होईल.”
